प्रशांत किशोर यांची राजकीय वाटचालीबाबत मोठी घोषणा
Prashant Kishor News :निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांची काँग्रेससोबतची चर्चा निष्फळ ठरली आहे. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी आगामी काळातील राजकीय वाटचालीबाबत मोठी घोषणा केली आहे.
नवी दिल्ली : Prashant Kishor News :निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांची काँग्रेससोबतची चर्चा निष्फळ ठरली आहे. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी आगामी काळातील राजकीय वाटचालीबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यांनी आज केलेल्या ट्विटमुळे ते नवा पक्ष स्थापन करणार असल्याचे संकेत दिले आहेत. (Political Strategist Prashant Kishor New Announcement on Tweet)
लोकशाहीतील खऱ्या समस्या समजून घेण्यासाठी आता खऱ्या लोकांकडे वळणार असून सुरुवात बिहारपासून करणार आहे, असं ते म्हणाले. त्यामुळे आता प्रशांत किशोर राजकीय पक्ष स्थापन करणार का, अशी चर्चा आहे.
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर नवा पक्ष काढणार, अशी चर्चा आता सुरु झाली आहे. प्रशांत किशोर यांच्या ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ उडालीआहे. नवा पक्ष स्थापन करणार असल्याचे ट्विटद्वारे संकेत मिळत आहेत. बिहारमधून सुरुवात करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
लोकशाहीत सहभागी होण्याचा आणि लोकाभिमुख धोरण तयार करण्यासाठी मदत करण्यात मी 10 वर्ष घालवली आहेत. पण, आता लोकशाही-सुशासन समजून घेण्यासाठी खऱ्या हिरोकडे म्हणजे जनतेकडे जाण्याची वेळ आली आहे. याची सुरुवात बिहारपासून करणार आहे, असे ट्विट प्रशांत किशोर यांनी केले आहे.
प्रशांत किशोर हे निवडणूक रणनीतीच्या कौशल्यासाठी देशभर ओळखले जातात. नरेंद्र मोदी हे गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी असताना 2012 च्या आसपास प्रशांत किशोर यांनी मोदी यांच्यासोबत काम करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत किशोर यांनी नरेंद्र मोदींच्या निवडणूक प्रचारासाठी मदत केली होती. भाजपशी पटेनासे झाले त्यानंतर नितीश कुमार यांच्याबरोबर काम केले. जेडीयूतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी ममता बॅनर्जी आणि काँग्रेसाठी काम केले.