नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानातल्या तणावामुळं अवघा देश चिंताग्रस्त असताना भाजप आणि काँग्रेसचं मात्र कुरघोडीचं राजकारण सुरू आहे. पंतप्रधान मोदींनी मेरा बुथ सबसे मजबूत अशी भाजपाची मोहीम सुरू केल्यानंतर, काँग्रेसनंही मेरा जवान सबसे मजबूत असा टोला लगावला आहे. भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. त्यांची लवकरात लवकर सुटका व्हावी, यासाठी अवघा देश प्रार्थना करत होता पण राजकारण्यांना त्याचं काहीच सोयरसूतक नाही. भारत आणि पाकिस्तान युद्ध होणार का, अशा चिंतेत देशवासीय असताना, सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसचे नेते मात्र राजकारणात मश्गूल आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदींनी देशाला कोणासमोरही झुकू देणार नाही, अशी ग्वाही दिली होती. पण पाकिस्तानकडून भारताच्या हद्दीत कारवाया सुरू असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मात्र गुरूवारी मेरा बुथ, सबसे मजबूत ही भाजपाची नवी राजकीय मोहीम सुरू केली. अर्थात भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधताना, भारतीय सैनिकांच्या पाठिशी उभं राहण्याचं आवाहन करायला ते विसरले नाहीत.


भाजपच्या या मेरा बुथ सबसे मजबुत मोहीमेवर नेटिझन्सनी देखील जोरदार आक्षेप घेतला. मेरा जवान सबसे मजबुत असा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला. काँग्रेसनंही यानिमित्तानं भाजपवर टीकेची आयती संधी साधली.


सीमेवर जवान प्राण पणाला लावून पाकिस्तानचा मुकाबला करण्यासाठी सज्ज आहेत. तर दुसरीकडं राजकारण्यांना मात्र लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत.