नवी दिल्ली : काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रियंका गांधी यांनी मंगळवारी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी लक्षवेधी वक्तव्य केलं. सत्तेत हल्ली घृणेचाच बोलबाला आहे तोच मी बदलू इच्छिते, हे सर्व महिला बदलू शकतात असं त्या म्हणाल्या. देशाला धर्म आणि जातियवादाच्या राजकारणातून दूर आणत एकात्मतेच्या राजकारणाच्या दिशेवर आणायचं असेल तर महिलांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशमध्ये येत्या काळात निवडणुकांसाठी जवळपास 40 टक्के महिला उमेदवारांना संधी देण्यात येईल अशी प्रतिज्ञाच त्यांनी घेतली. उत्तर प्रदेशसोबतच देशाच्या राजकारणातही महिला भक्कम स्थानी दिसतील असं त्या म्हणाल्या. जातिय तेढ निर्माण करत महिलांमध्येही फूट पाडण्याचं सत्र सुरु असण्याकडे त्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं. 


माझ्या हातात सत्ता असती तर, महिलांना 50 टक्के उमेदवारी दिली असती. पण, प्रत्येत प्रक्रियेची एक सुरुवात असते असं म्हणत आपल्याला उमेदवार मिळतीलही आणि त्या लढतीलही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उत्तर प्रदेशातील प्रभारी म्हणून आपण हा निर्णय घेतला असून, महिलेच्या सक्षमतेच्या बळावर उमेदवारी तिकीट देण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट करत निवडणुकीसाठी उत्सुक असणाऱ्यांनी आपल्याला येऊन भेटावं असं आवाहन केलं. तेव्हा आता प्रियंका गांधी यांचं हे आवाहन नेमकं कोण स्वीकारतं हे पाहणं महत्त्वाचं असेल.