नवी दिल्ली : चीनमध्ये सध्या विजेचं संकट सुरू आहे. उद्योगांची वीज कापली जात आहे. त्याचा परिणाम त्यांच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. परंतु भारतातही वीज निर्मितीचं मोठं संकट उभं राहिलं आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्रालय आणि अन्य एजेंसीच्या आकडेवारीनुसार तज्ज्ञांनी हा इशारा दिला आहे. मंत्रालयातील आकडेवारी नुसार देशातील एकूण 135 औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रांपैकी फक्त 72 केंद्रांमध्ये 3 दिवस पूरेल इतकाच कोळसा शिल्लक राहिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तज्ज्ञांच्या मते, 135 औष्णिक विद्युत केंद्रांमध्ये एकूण 66.35 टक्के विज निर्मिती केली जाते. जर 72 विजनिर्मिती केंद्र कोळशाच्या अभावी बंद झाले तर साधारण 33 टक्के विजेची निर्मिती कमी होईल. यामुळे देशात विजेचं संकट उत्पन्न होऊ शकतं.


ऑगस्ट 2019 मध्ये भारतात दररोज 10660 कोटी युनिट वीज वापरली जात होती. ती ऑगस्ट - सप्टेंबरमध्ये वाढून 14420 कोटी युनिट झाली आहे. दोन वर्षात कोळशाचा वापर 18 टक्क्यांनी वाढला आहे.


देशातील कोळशाच्या संकटामुळे विजनिर्मितीत अडचणी येऊ शकतात यासंबधिचे आकलन तज्ज्ञांनी ऑगस्टमध्येही केले होते.