नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सोमवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. छातीत संसर्ग झाल्यामुळं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. असं असलं तरीही शाह यांची प्रकृती स्थिर असल्याचं कळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांच्या माहितीनुसार सोमवारी शाह यांनी एका खासगी रुग्णालयात सिटी स्कॅन केला. ज्याच्या अहवालात त्यांना छातीत संसर्ग झाल्याचं निदान झालं. ज्यानंत डॉक्टरांच्या सांगण्यावरुन त्यांनी स्वत:  एम्स रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला. एम्सचे संचालक आणि तज्ज्ञ डॉक्टर रणदीप गुलेरिया यांच्या निरिक्षणाअंतर्गत सध्या शाह यांच्यावर उपचार सुरु आहेत. पुढील चोवीस तासांसाठी त्यांना निरिक्षणाअंतर्गत ठेवण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. 


काही दिवसांपूर्वीच अमित शाह यांनी कोरोनावर मात केली. जवळपास दोन आठवडे कोरोनावरील उपचार घेतल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली होती. ज्यानंतर आता त्यांच्यावर एम्समध्ये छातीच्या संसर्गावरील उपचार सुरु आहेत. 


 


२ ऑगस्टला आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती अमित शाह यांनी दिली होती. कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असली, तरी अमित शाह यांना कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळली नव्हती. पण खबरदारीचा उपाय म्हणून अमित शाह मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते.