नवी दिल्ली : गेल्यावर्षी ८ नोव्हेंबर रोजी नोटबंदी करण्याचा ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारने घेतला. यामुळे १००० आणि ५०० रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्या. चलनातून बाद झालेल्या नोटांपैकी किती नोटा आरबीआयकडे जमा झाल्या याची माहिती आता समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोटबंदीच्या आठ महिन्यांनंतरही किती नोटा आरबीआयकडे जमा झाल्या याची माहिती समोर आली नव्हती. यामुळे सर्वांच्याच मनात अनेक प्रश्न उपस्थित होत होते. मात्र, आता आरबीआयने यासंदर्भात माहिती दिली आहे.


प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मार्च २०१७ पर्यंत ८,९२५ कोटींच्या १००० रुपयांच्या नोटा वितरणात होत्या. वितरणात असलेल्या नोटा म्हणजेच रिझर्व्ह बँकेच्या बाहेर असलेल्या नोटा असे आरबीआयने म्हटले आहे.


अर्थ राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी ३ फेब्रुवारीला लोकसभेत सांगितले होते की, ८ नोव्हेंबरपर्यंत ६.८६ कोटी रुपयांहून अधिक मूल्य असलेल्या १००० रुपयांच्या नोटा वितरणात होत्या. मार्च २०१७ पर्यंत चलनात असलेल्या १००० रुपयांच्या नोटांचं प्रमाण हे १.३ टक्के होतं. म्हणजेच ९८.७ टक्के नोटा रिझर्व्ह बँकेत जमा झाल्या आहेत.