भोपाळ : नोटबंदीच्या निर्णायाला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे निर्णयाने काय साधले हा प्रश्न सर्व स्तरातून विचारला जात आहे. सरकारवर अनेक आरोप होत आहेत तर, सरकार अद्यापही नोटबंदीचे समर्थन करत आहे. दरम्यान, नोटबंदीमुळे वेश्याव्यवसायावर मोठा परिणाम झाल्याची माहिती खुद्द भाजपच्याच केंद्रीय मंत्र्याने दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही हा दावा केला आहे. नोटबंदीचे फायदे या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते भोपाळ येथे बोलत होते. या वेळी रविशंकर प्रसाद म्हणाले, नोटंबदीच्या निर्णयामुळे वेश्या व्यवसायात मोठी घट झाली आहे. हा दावा करताना प्रसाद यांनी कोणतीही आकडेवारी दिली नाही. मात्र, या क्षेत्रातील दलालांना आता पुर्वीसारखा पैसा मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले.


रविशंकर प्रसाद हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहाण यांच्यासोबत पत्रकार परिषदही घेणार होते. मात्र, चित्रकूट येथील पोटनिवडणूकीच्या प्रचारासाठी जायचे असल्याने ते या पत्रकार परिषदेत सहभागी होऊ शकले नाहीत. 


रविशंकर यांनी दिल्लीवरून येतानाच ४ पानांची नोट तयार घेऊन आले होते. या नोटच्या आधारे त्यांनी नोटबंदीच्या फायद्याबाबत विस्ताराने चर्चा केली. या वेळी प्रसाद यांनी कॉंग्रेसला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करत जोरदार टीका केली. कॉंग्रेसच्या काळात घोटाळ्यांची मालिकाच तयार झाली. मात्र, याउलट मोदींच्या तीन वर्षांच्या काळात एकही घोटाळा बाहेर आला नसल्याचेही प्रसाद यांनी सांगितले.


दरम्यान, प्रसाद यांनी वेश्याव्यवसायात घट झाल्याच्या मुद्द्याबाबत आकडेवारी विचारली असता त्यांनी आकडेवारी दिली नाही. मात्र, आपण सांगितलेली आकडेवारी ही गृहमंत्रालयाकडून आलेल्या माहितीच्या आधारावर आहे, असे त्यांनी सांगितले. पुढे त्यांनी हेही सांगितले की, आता वेश्या व्यवसायातील दलालांना पहिल्यासारख्या १०००-५०० च्या नोटा मिळत नाहीत.