उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारी याचा गुरुवारी जेलमध्ये मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली होती. दरम्यान मृत्यूच्या काही दिवस आधी मुख्तार अन्सारीने आपल्यावर विषप्रयोग केला जाण्याची भीती व्यक्त केली होती. यामुळे कुटुंबाने विष देऊन त्याला ठार केल्याचा आरोप केला होता. दरम्यान मुख्तार अन्सारीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला आहे. यामध्ये ह्रदयविकाराच्या झटक्यानेच मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, मायोकार्डिअल इंफाक्र्शनमुळे ह्रदयविकाराचा झटका आला आणि मृत्यू झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारीच्या अचानक मृत्यूनंतर कुटुंबाने शंका व्यक्त केली होती. विष देऊन त्याला ठार केल्याचा त्यांचा आरोप होता. एम्समधील डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याचा पोस्टमॉर्टम व्हावा अशी मागणी त्यांनी केली होती. या आरोपांनंतर बांदा येथील मुख्य न्यायदंडाधिकारी भगवान दास यांनी मुख्तार अन्सारी याच्या मृत्यूच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले होते. 


गुरुवारी रात्री मुख्तार अन्सारीची बांदा जेलमध्ये प्रकृती बिघडली होती. बेशुद्ध अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर मुख्तार अन्सारीचा मृतदेह त्याचं जन्मठिकाण गाजिपूरमध्ये आणण्यात आला. येथील कालिबागमधील दफनभूमीत त्याचा मृतदेह दफन करण्यात आला. मुख्तार अन्सारीच्या अंत्ययात्रेला लोकांनी तुफान गर्दी केली होती. यावेळी त्याच्या समर्थनार्थ घोषणाही देण्यात आल्या. 


कालिबाग दफनभूमीत केलं दफन


दफनभूमीत फक्त कुटुंबातील लोकांना माती देण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. यावेळी दफनभूमीपासून ते गाजीपूरपर्यंत कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली होती. यावेळी त्याची पत्नी अफशा उपस्थित नव्हती. अफशावरही अनेक गुन्हे दाखल असून, ती फरार आहे. यावेळी त्याच्या मुलाने मिशांवर ताव देत बापाला शेवटचा निरोप दिला. समर्थकांना यावेळी दफनभूमीत जाण्याची परवानगी दिली नव्हती.


63 वर्षीय मुख्तार अन्सारी उत्तर प्रदेशातील बांदा जेलमध्ये शिक्षा भोगत होता. त्याने वयाच्या 15 व्या वर्षी गुन्हेगारीला सुरुवात केली होती. 1963 मध्ये एका मोठा कुटुंबात त्याचा जन्म झाला होता. त्याने सरकारी कंत्राट माफियांमध्ये स्वत:ची टोळी स्थापन केली. 1986 पर्यंत त्याने कॉन्ट्रॅक्ट माफिया वर्तुळात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्याच्यावर एकूण 65 गुन्हे दाखल होते. अन्सारी पाच वेळा आमदार राहिला होता.