नवी दिल्ली -  पोस्टामध्ये ठेवण्यात येणाऱ्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन ठेवींच्या आणि इतर गुंतवणुकींच्या व्याजदरामध्ये दर तिमाहीमध्ये बदल केले जातात. चालू आर्थिक वर्षाच्या अंतिम तिमाहीसाठीचे व्याजदर पोस्टाकडून जाहीर करण्यात आले आहेत. ३१ डिसेंबर २०१८ रोजी केंद्रीय वित्त मंत्रालयाने जाहीर केलेल्या आदेशांनुसार, छोट्या गुंतवणुकीवरील व्याजदरांमध्ये बदल करण्यात आले आहेत. नव्या बदलानुसार पोस्टाकडून एक वर्षांसाठीच्या मुदत ठेवीसाठी ७ टक्के व्याजदर जाहीर करण्यात आले आहे. अर्थात हे फक्त मुदत ठेवीच्या एक जानेवारी ते ३१ मार्च २०१९ या तिमाहीसाठीच लागू असेल. याआधीच्या तिमाहीसाठी हेच व्याजदर ६.९ टक्के इतके होते. तीन वर्षांसाठीच्या मुदत ठेवींवरील व्याजदर ७.२ टक्क्यांवरून ७ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे. पोस्टाच्या इतर सर्व योजनांवरील व्याजदरामध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाही. याचाच अर्थ या योजनांवरील व्याजदर मागील तिमाही इतकेच कायम राहणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोस्टाकडे एकूण १२ प्रकारची बचत खाती आहेत. त्यामध्ये बचत खाते, एका वर्षांची मुदत ठेव, २ वर्षांची मुदत ठेव, ३ वर्षांची मुदत ठेव, ५ वर्षांची मुदत ठेव, पाच वर्षांसाठीचे रिकरिंग खाते, ५ वर्षांसाठीचे ज्येष्ठ नागरिक बचत खाते, ५ वर्षांसाठीचे मासिक उत्पन्न खाते, ५ वर्षांसाठीचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते, किसान विकास पत्र आणि सुकन्या समृद्धी योजना यांचा समावेश होतो. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नव्या व्याजदरांना मंजुरी दिली आहे.