Anand Mahindra Potholes Video: महिंद्रा अँड महिंद्राचे सर्वेसर्वा आणि उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर सक्रिय असतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवरून आनंद महिंद्रा सर्वसामान्य नेटकऱ्यांशी थेट संवाद साधतात. आनंद महिंद्रा कधी एखादी पोस्ट टाकतात, याची नेटकरी आतुरतेने वाट पाहात असतात. त्यांनी शेअर केलेल्या पोस्ट आणि व्हिडीओ पाहून नेटकरी व्यक्त होत असतात. असाच एक व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी शेअर केला आहे. खरं तर हा व्हिडीओ आपल्या सर्वसामान्य जनतेशी निगडीत आहे. कारण रस्त्यावरील खड्ड्यामुळे कुणी त्रस्त नसेल, असं होऊच शकत नाही. पावसाळ्यात तर रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला व्हिडीओ पाहून सर्वच आवाक झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडीओमध्ये अवघ्या 60 सेकंदात रस्त्यावरील खड्डे बुजवले गेल्याचं दिसत आहे. खड्डे बुजवण्याचे हे नवीन तंत्र आहे. रस्त्यावरील खड्डे पॅचच्या माध्यमातून बुजवले जात आहेत. इतकंच नाही तर या पॅचवरून गाड्या न अडखळता व्यवस्थितरित्या धावू शकतात. रस्त्यावर वापरण्यात येणाऱ्या या नवीन तंत्रज्ञानाचे उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी कौतुक केले. 



व्हिडीओ शेअर करत आनंद महिंद्रा यांनी सांगितलं की, 'मी म्हणेन की भारतात या तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे.  बिल्डिंग/बांधकाम कंपन्यांना याचे अनुकरण करावे लागेल किंवा या फर्मसोबत कोलॅबरेट करावे लागेल!' हा पूर्ण दोन मिनिटांचा व्हिडिओ असून काही कामगार एकत्र येऊन काही मिनिटांत रस्त्यावरील खड्डे बुजवतात. आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ सुमारे साडेसहा लाख लोकांनी पाहिला आहे.


भारतातील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक अपघात होतात आणि हे टाळण्यासाठी तंत्रज्ञान उपयुक्त ठरू शकते. पावसाळ्यात रस्त्यावरील खड्डे पाण्याने भरतात आणि खड्डा कुठे आहे हे कळत नाही. यामुळे मोठा अपघात होऊ शकतो. कधी कधी या अपघातात जीव देखील जाऊ शकतो.