नवी दिल्ली : खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना नथुराम गोडसेबद्दल केलेलं वादग्रस्त वक्तव्य भोवलंय. प्रज्ञासिंह ठाकूर यांची संरक्षण समितीवरून हकालपट्टी करण्यात आलीय. भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांनी प्रज्ञासिंह यांचं वक्तव्य निषेधार्ह असून भाजप त्याचं समर्थन करत नसल्याचं म्हटलंय. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त म्हटलं होतं. त्यावरून वाद निर्माण झाला आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साध्वींच्या या वक्तव्यावर विरोधकांनी तीव्र आक्षेप नोंदवलाय. संघ आणि भाजपच्या जे मनात आहे, ते साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या आहेत. हे काही लपून राहिलेलं नाही. प्रज्ञासिंह ठाकूर यांची हकालपट्टी व्हावी, असं सांगून मी माझा वेळ फुकट घालवणार नाही, असं राहुल गांधी म्हणाले. तर या प्रकरणावर जे बोलायचं होतं ते आम्ही बोललो आहोत, असं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या आहेत. 


लोकसभेमध्ये एसपीजी संशोधन बीलावर डीएमके खासदार ए राजा यांनी आपले मत मांडले. गांधीहत्येबद्दल गोडसेनी केलेल्या वक्तव्याचा उल्लेख यावेळी त्यांनी केला. ए राजा बोलत असताना साध्वी प्रज्ञा सिंह यांनी त्यांना अडवले. तुम्ही एका देशभक्ताचे उदाहरण देऊ शकत नाही असे साध्वी यांनी म्हटले. त्यांच्या या विधानाने लोकसभेत गोंधळ निर्माण झाला. प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे हे विधान लोकसभा कार्यवाहीतून हटवण्यात आले.


साध्वी प्रज्ञासिंह यांची वादात अडकण्याची ही काही पहीलीच वेळ नाही आहे. साध्वी प्रज्ञासिंह यांनी हेमंत करकरे यांच्या मृत्यूबाबत धक्कादायक विधान केले होते. करकरे यांनी मला विनाकारण मालेगाव बॉम्बस्फोटात गोवले. त्यांनी मला प्रचंड यातना दिल्या. त्यांचा मृत्यू त्यांच्या कर्मामुळेच झाला. मी त्यांना तुमचा सर्वनाश होईल, अशा शाप दिला होता. तो अखेर खरा ठरला, असे वक्तव्य साध्वी यांनी केले होते.


आमच्यासाठी करकरे शहीदच आहेत. साध्वी यांचे मत वैयक्तिक आहे. कदाचित तुरुंगात असताना भोगाव्या लागलेल्या शारीरिक आणि मानसिक हालअपेष्टांमुळे त्या अशाप्रकारे व्यक्त झाल्या असाव्यात, अशी सारवासारव भाजपने केली होती.


साध्वी प्रज्ञा २००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी आहेत. सध्या त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. मी बाबरी मशीदीच्या वर चढले होते आणि मशीद पाडण्यास मदत केली होती असे वक्तव्य प्रज्ञा सिंह यांनी केले होते. निवडणूक आयोगाने तात्काळ आक्षेप घेत आचार संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस जारी केली. मध्य प्रदेशचे मुख्य निर्वाचन अधिकारी वी एल कांता राव यांनी ही कारवाई केली होती.