`ओडिशाच्या मोदीं`चं हे वक्तव्य ऐकून अनेकांना अटल बिहारी वाजपेयींची आठवण
त्यांचा हा व्हिडिओ पाहून कुणाला माजी पंतप्रधान आणि भाजपा नेते अटल बिहारी वाजपेयींची आठवण न आली तरच नवल...
नवी दिल्ली : ओडिशाच्या बालासोर मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार प्रताप चंद्र सारंगी यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर दणदणीत विजय मिळवला... एव्हढच नाही तर त्यांनी काल पदाची आणि गोपनियतेची शपथ घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात आपलं स्थानही पक्क केलं. सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग (राज्यमंत्री) तसंच पशुपालन, दुग्ध आणि मस्यपालन (राज्यमंत्री) विभागाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आलीय. मंत्रिपदाची शपथ घ्यायला गेलेल्या प्रताप चंद्र सारंगी यांच्यासाठी राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यासाठी वाजल्या नसतील एवढ्या टाळ्या वाजल्या... साधं आणि सरळ आयुष्य जगणाऱ्या प्रताप चंद्र यांना 'ओडिशाचे मोदी' म्हणून ओळखलं जातं. त्यांच्या जीवनशैलीची तुलनाही लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींशी करतात. एकही पैसा खर्च केल्याशिवाय त्यांनी निवडणुकीत आपल्या प्रतिस्पर्ध्यांना पाणी पाजलं आणि निवडून आले. सारंगी यांनी आपला संपूर्ण प्रचार हा सायकलवर केला.
'अविवाहीत आहे पण ब्रह्मचारी नाही'
६४ वर्षीय प्रताप सारंगी यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच सोशल मीडियावर त्यांचा एक जुना व्हिडिओ पुन्हा व्हायरल होताना दिसू लागला. या व्हिडिओत सारंगी एका स्थानिक टीव्हीला मुलाखत देताना दिसत आहेत. यामध्ये ते अविवाहीत असल्याचं तर कबूल करतात परंतु, आपण ब्रह्मचारी नसल्याचंही त्यांनी यात म्हटलं. 'तुम्ही अविवाहीत आहात की ब्रह्मचारी?' असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी 'मी अविवाहीत आहे परंतु, ब्रह्मचारी नाही' असं सांगत अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला होता.
अधिक वाचा - ...जेव्हा 'ब्रह्मचारी'वर कलामांनी घेतली वाजपेयींची फिरकी!
वाजपेयींची आठवण
त्यांचा हा व्हिडिओ पाहून कुणाला माजी पंतप्रधान आणि भाजपा नेते अटल बिहारी वाजपेयींची आठवण न आली तरच नवल... कलाम यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी आजीवन अविवाहीत राहण्याचा निर्णय घेतला होता, असं म्हटलं जातं. परंतु, वाजपेयी यांनी स्वत: अनेकदा 'मी अविवाहीत आहे, ब्रह्मचारी नाही' असं उघडपणे सांगितलं होतं. अर्थातच, सारंगी यांचा हा व्हिडिओ पाहून अनेकांना अटल बिहारी वाजपेयींची आठवण आली. प्रताप चंद्र सारंगी यांचा शपथविधी पार पडल्यानंतर त्यांच्या या व्हिडिओची राजकीय वर्तुळातही चांगलीच चर्चा सुरू आहे.
आकर्षण 'साधेपणाचं'
सारंगी दुसऱ्यांदा चर्चेचा विषय ठरत आहेत. यापूर्वी दिल्ली जाण्यासाठी निघताना आपली आपली बॅग भरतानाचाही त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. लोकांना सारंगी यांच्या साधेपणाचं आकर्षण वाटतंय. सारंगी यांची ओळख त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यामुळे आहे. ते अविवाहीत असून एका छोट्या घरात राहतात... तसंच संन्याशाप्रमाणेच ते आपलं जीवन व्यतीत करतात. त्यांना 'फकीर' म्हणूनही ओळखलं जातं. त्यांच्याकडे १.५ लाखांची चल आणि १५ लाख रुपयांची अचल संपत्ती आहे. त्यांच्याविरुद्ध ७ गुन्हे दाखल आहेत.