...जेव्हा 'ब्रह्मचारी'वर कलामांनी घेतली वाजपेयींची फिरकी!

... आणि उपस्थितांत एकच हशा पिकला 

Updated: Aug 16, 2018, 05:38 PM IST
...जेव्हा 'ब्रह्मचारी'वर कलामांनी घेतली वाजपेयींची फिरकी! title=

मुंबई : अटल बिहारी वाजपेयी यांनी मे १९९६ (१३ दिवस), १९९८ ते १९९९ (१३ महिने) आणि १९९९ ते २००४ अशा तीन वेळा पंतप्रधानपदाची शपथ घेतली... त्यांच्याच कार्यकाळात 'मिसाईलमॅन' एपीजे अब्दुल कलाम यांनी २५ जुलै २००२ रोजी कलाम यांनी भारताच्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली होती. वाजपेयी यांनी विचारल्यानंतरच अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती पदावर विराजमान होण्यासाठी होकार दिला होता, हे विशेष... 

कलाम यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी आजीवन अविवाहीत राहण्याचा निर्णय घेतला होता, असं म्हटलं जातं. परंतु, वाजपेयी यांनी स्वत: अनेकदा 'मी अविवाहीत आहे, ब्रह्मचारी नाही' असं उघडपणे सांगितलं होतं. अर्थातच, वाजपेयींच्या या वाक्याचा अर्थ प्रत्येकानं आपापल्या कुवतीप्रमाणे लावला. 

डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या विनोदबुद्धी मोठी तेजतर्रार... पंतप्रधान वाजपेयींप्रमाणेच डॉ. कलाम यांनीदेखील विवाह केला नव्हता. दोघांमध्ये मित्रत्वाचं नातं निर्माण झालं होतं. त्यामुळेच डॉ. एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आपलं नामांकन दाखल करत असताना वाजपेयींनी मुद्दाम त्यांचं लक्ष 'वैवाहिक स्थिती'च्या रकान्याकडे वेधलं...

यावर अजिबात वेळ न घेता कलामांनी 'मी केवळ अविवाहीतच नाही तर ब्रह्मचारीही आहे' असं म्हणत वाजपेयींचीच फिरकी घेतली... आणि उपस्थितांत एकच हशा पिकला. 

'स्वप्नद्रष्टा डॉ. कलाम की जीवनगाथा' या पुस्तकात हा किस्सा वर्णन करण्यात आलाय.