कानपूर : उत्तर प्रदेशमध्ये कानपूर सेंट्रल स्टेशनवर प्रवाशांच्या स्क्रिनिंगसाठी तसंच तपासणीसाठी उपस्थित असलेल्या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी प्रसूतीच्या वेदनांनी पीडित असलेल्या एका महिलेची सुखरुप प्रसूती केली. गर्भवती महिलेला पोटात अचानक वेदना होऊ लागल्या. तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी महिलेच्या भोवती चादरी धरुन तेथेच तिची प्रसूती केली गेली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रसुतीनंतर या महिलेला आणि नवजात बाळाला डफरीन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.


रात्री 9च्या सुमारास कानपूर सेंट्रल स्टेशनवर प्रवाशांना घेऊन एक ट्रेन पोहचली होती. त्यावेळी सामुदायिक आरोग्य केंद्र, पात्रा येथील डॉक्टरांची एक टीम प्रवाशांच्या स्क्रिनिंग आणि तपासणीसाठी उपस्थित होती. त्याचदरम्यान एका मजूराच्या पत्नीला प्रसुती कळा होऊ लागल्या. त्यावेळी उपस्थित डॉक्टर कविता यादव यांनी या महिलेची जबाबदारी घेत तिची डिलिव्हरी सुखरुप पार पाडली. त्या महिलेने एका मुलीला जन्म दिला. आई आणि बाळ दोघेही स्वस्थ असल्याची माहिती मिळत आहे.


अशा कठिण प्रसंगी ज्याप्रमाणे डॉक्टर कविता यांनी महिलेला मदत केली, त्यासाठी महिलेने डॉक्टरांचे आभार मानले आहेत. महिलेने डॉक्टरचे आभार मानत, डॉक्टरांच्या कविता नावावरुन आपल्या मुलीचं नावही कविता ठेवणार असल्याचं त्या महिलेने सांगितलं.


संपर्ण देश कोरोनाच्या विळख्यात आहे. या काळात सर्व जण घरी आहेत. मात्र आरोग्य सेवेतील कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस, सफाई कामगार आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा करत आहेत. जनतेसाठी ते तासंतास झटत आहेत. त्यामुळे डॉक्टर, नर्सेसच्या रुपात देवच आपली मदत करत असल्याची भावना सर्वांकडून व्यक्त होत आहे.