President Election: विरोधकांना मोठा धक्का, मायावती यांचा भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएला आणखी एका पक्षाचा पाठिंबा मिळाला आहे.
नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदासाठी (President Election 2022) भाजपकडून झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना उमेदवार बनवण्यात आलं आहे. द्रौपदी मुर्मू यांना भाजपच्या विरोधकांकडून देखील पाठिंबा मिळताना दिसत आहे. अनेक पक्षांनी द्रौपदी मुर्मू यांच्या नावाला पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहेत. (Mayawati support to Draupadi Murmu)
बहुजन समाज पक्ष (BSP) ने म्हटले आहे की, ते आगामी राष्ट्रपती निवडणुकीत झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार आहेत. बसपा अध्यक्ष मायावती यांनी त्यांच्या पक्षाच्या एका महत्त्वपूर्ण बैठकीनंतर देशातील सर्वोच्च पदासाठी होणाऱ्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे.
बसपा प्रमुख मायावती म्हणाल्या की, 'आम्ही राष्ट्रपतीपदासाठी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. आमचा हा निर्णय ना भाजप किंवा एनडीएच्या समर्थनार्थ आहे ना विरोधी पक्ष म्हणजेच यूपीएच्या विरोधात आहे, पण आमचा पक्ष आणि आंदोलन लक्षात घेऊन आम्ही हा निर्णय घेतला आहे.'
2014 पासून बसपची राजकीय ताकद निश्चितच कमी झाली असली तरी आजही कोणताही राजकीय पक्ष बसपच्या कॅडर व्होटकडे दुर्लक्ष करू शकत नाही. अशा परिस्थितीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या मायावतींच्या या निर्णयाचाही अर्थ लावला जात आहे.
एका सक्षम आणि समर्पित आदिवासी महिलेला त्यांचे विचार आणि चळवळ लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे मायावती यांनी स्पष्ट केले. मायावती यांनी राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवताना बसपला सल्लामसलत करण्यापासून दूर ठेवल्याबद्दल विरोधी पक्षांवर टीका केली आणि त्यांचा पक्ष राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत स्वतःचा निर्णय घेण्यास स्वतंत्र असल्याचे सांगितले.
एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
18 जुलैला मतदान, 21 जुलै रोजी निकाल
काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा 27 जून रोजी राष्ट्रपतीपदासाठी अर्ज दाखल करणार आहेत. 18 जुलै रोजी मतदान होणार असून 21 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.