Kolkata Rape Case : `मी व्यथित झालीये, देशात जर...`, कोलकाता प्रकरणावर राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू काय म्हणाल्या?
Draupadi murmu speaks on kolkata case : कोलकातामधील डॉक्टरच्या बलात्कार प्रकरणामुळे एकीकडे संताप व्यक्त होत असताना दुसरीकडे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.
Kolkata Doctor Rape Murder Case : पश्चिम बंगालमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येविरोधात देशभरातून संताप व्यक्त होत आहे. तर अनेक नेत्यांनी, कलाकारांनी यावर जाहीर राग देखील व्यक्त केला आहे. अशातच आता या प्रकरणावर देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी भाष्य व्यक्त करून प्रकट नाराजी व्यक्त केलीये. देशातील घृणास्पद मानसिकता असलेले लोक महिलांवर अत्याचार करतात, अशी गोष्टींना आळा घालणं आवश्यक आहे, असं द्रोपदी मुर्मू म्हणाल्या आहेत. त्यावेळी त्यांनी समाजाला विकृतीशी मुकाबला करण्याचं आव्हान देखील केलंय.
नेमकं काय म्हणाल्या राष्ट्रपती?
समाजाने प्रामाणिकपणाने, निःपक्षपातीपणाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. लोकांना स्वतःला काही कठीण प्रश्न विचारावे लागतील. अनेकदा घृणास्पद मानसिकता असलेले लोक महिलांवर अत्याचार करतात कारण ते महिलांना कमी ताकदवान म्हणून पाहतात, असं राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू म्हणाल्या. निर्भयाच्या घटनेनंतर 12 वर्षात समाज बलात्काराच्या असंख्य घटना विसरला आहे. विसरण्याची ही सामूहिक सवय घृणास्पद आहे. केवळ इतिहासाला सामोरे जाण्याची भीती वाटणारा समाजच गोष्टी विसरतो, असं म्हणत राष्ट्रपतींनी नाराजी व्यक्त केली.
मला धक्का बसला आहे आणि व्यथित झालो आहे. कोणताही सुसंस्कृत समाज मुली आणि बहिणींवर असा अत्याचार होऊ देऊ शकत नाही, असंही द्रोपदी मुर्मू यांनी म्हटलंय. आता भारताने आपल्या इतिहासाला पूर्णपणे सामोरं जाण्याची वेळ आली आहे. या विकृतीला आपण एकत्रितपणे सामोरं जाणं आवश्यक आहे. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी आपण सर्वसमावेशकपणे सामना करूया, असं आवाहन राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी केलं आहे.
दरम्यान, आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये बलात्कार आणि हत्या झालेल्या महिला डॉक्टरला न्याय मिळावा या मागणीसाठी भाजप कार्यकर्त्यांनी आसनसोलमध्ये निदर्शने केली. तर आम्हाला न्याय हवा आहे, पण भाजपने आज बंदची हाक दिली आहे. त्यांना न्याय नको आहे, ते फक्त बंगालला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.