लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांनी कुक्कुटपालन थांबवल्याने चिकनच्या दरात वाढ
कर्नाटकच्या हुबळी परिसरात ग्राहकांना चिकन खरेदी करण्यासाठी नेहमीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागत आहेत.
बंगळुरु: काही दिवसांपूर्वी चिकन खाल्ल्याने कोरोना होतो, या अफवेमुळे देशभरातील पोल्ट्री व्यावसायिक देशोधडीला लागले होते. मात्र, आता लॉकडाऊनच्या काळात पोल्ट्रीच्या व्यवसायाला पुन्हा सुगीचे दिवस येण्याची शक्यता आहे. कारण कर्नाटकमध्ये लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर चिकनच्या दरांमध्ये मोठी वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. कर्नाटकच्या हुबळी परिसरात ग्राहकांना चिकन खरेदी करण्यासाठी नेहमीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागत आहेत.
कोरोनाच्या अफवेने पोल्ट्री व्यावसायिक देशोधडीला
मध्यंतरीच्या काळात अनेक शेतकऱ्यांनी कुक्कुटपालन थांबवले होते. त्यामुळे आता बाजारपेठेत कोंबड्यांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे चिकनच्या दरात वाढ झाल्याची माहिती चिकन सेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष नागराज पट्टण यांनी दिली.
कोरोनाचा फटका, अंड्याच्या भावात कोंबड्यांची विक्री
यापूर्वी मार्च महिन्यात कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या काळात चिकन खाल्ल्याने कोरोना पसरतो, अशी अफवा पसरली होती. त्यामुळे अनेक लोकांनी चिकन खाणे बंद केले होते. महाराष्ट्रातील पोल्ट्री व्यावसायिक आणि शेतकऱ्यांनाही याचा मोठा फटका बसला होता. चिकन खाल्ल्याने कोरोना होत नाही, असे वारंवार सांगूनही लोक भीतीपोटी चिकन खरेदी करायला तयार नव्हते. त्यामुळे अनेक ठिकाणी १० रुपयांत जिवंत कोंबडी विकण्याची वेळ चिकन व्यावसायिकांवर आली होती. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात चिकनचे दर स्थिर आहेत. मात्र, कर्नाटकप्रमाणे आपल्याकडेही कोंबड्यांचा तुटवडा जाणवायला लागल्यास ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे.