Shocking News : भारतीय संस्कृतीमध्ये अध्यात्म, धर्म, संस्कृती या सर्व गोष्टींना अतीव महत्त्वं असलं तरीही अनेकदा काही असे प्रसंग घडतात जेव्हा या धारणांवर अंधश्रद्धा वरचढ ठरताना दिसते. वाराणासीमध्ये नुकत्याच घडलेल्या एका घटनेतून हीच बाब समोर आली असून, या घटनेमुळं एकच खळबळ माजल्याचं पाहायला मिळत आहे. वाराणासी येथील गाय घाट  परिसरामध्ये पुजाऱ्यानं देवीनं साक्षात दर्शन न दिल्यामुळं व्यथित होत याच देवीपुढं स्वत:चं आयुष्य संपवलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी रात्री सदर घटना घडली असून, ज्यावेळी पुजारी देवीच्या आराधनेसाठी तिच्यापुढं उभा होता तेव्हाच त्यानं धारदार शस्त्रानं गळा चिरला. या धक्कादायक प्रकाराची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीनं घटनास्थळ गाठत मृतदेह ताब्यात घेत तो शवविच्छेदनासाठी पाठवला. 


उपलब्ध माहितीनुसार हा पुजारी त्याची पत्नी आणि मुलांसह इथंच वास्तव्यास असून, तो जवळपास 24 तासांपासून 'काली माँ'ची आराधना करत होता. पण, 24 तास उलटून गेले तरीही देवीनं आपल्याला साक्षात दर्शन दिलं नाही म्हणून त्यानं हताश होत आयुष्य संपवण्याचं धक्कादायक पाऊल उचललं. पुजाऱ्यानं हे टोकाचं पाऊल उचललं त्यावेशळी त्याची पत्नी घरातच होती, ज्यावेळी तिनं पतीला मृतावस्थेत पाहिलं तेव्हा जीवाच्या आकांतानं आक्रोश करत तिनं मदतीसाठी धावा केला. तातडीनं पुजाऱ्याला रुग्णालयातही नेण्यात आलं पण, तिथं त्याला मृत घोषित करण्यात आलं. 


हेसुद्धा वाचा : ...तर माझ्या अस्थी कोर्टाबाहेरच्या गटारात विसर्जित करा! पत्नीच्या छळाला कंटाळून स्वत:ला संपवलं


 


पोलीस तपासातून प्राथमिक स्वरुपात समोर आलेल्या माहितीनुसार सदर पुजारी धार्मिक समजुती आणि अध्यात्मानं अधिक प्रभावित होता आणि त्यानं काली मातेच्या दर्शनासाठी कैक दिवसांपासून साधना केली होती. देवीनं आपल्याला साक्षात दर्शन द्यावं अशीच त्याची धारणा होती. घटनास्थळाची दृश्य आणि सविस्तर माहितीच्या आधारे ही आत्महत्या असल्याचाच प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी लावला असून, पुढील तपासही सुरू केला आहे. 


(विचलित विचारधारणेतून कोणीही व्यक्ती आयुष्य संपवण्याच्या वार्ता करत असल्यास केंद्र सरकारच्या 18002333330 या जीवनसाथी हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा. इथं संपर्क साधणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवली जात असून, पीडितांना आवश्यक ती सर्व मदत आणि सल्ला दिला जातो. )