PM Modi Full Speech New Parliament Building: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जुन्या संसद भवनामधून नवीन संसद भवनात देशाचा कारभार चालवण्याआधी दिलेल्या आपल्या शेवटच्या भाषणाची सुरुवात गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देत केली. नवीन संसदेमध्ये आपण आपल्या भविष्याची श्री गणेशा करणार आहोत, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. हे भवन आणि येथील सेंट्रल हॉल हा एका प्रकार आपल्या भावनांनी भरलेला आहे. हे सेंट्रल हॉल आम्हाला भावूकही करतो आणि कर्तव्याची जाणीवही करुन देताना प्रेरणाही देतो. स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी याचा वापर एखाद्या ग्रंथालयासारखा केला जायचा. नंतर या ठिकाणी संविधानासंदर्भातील बैठका सुरु झाल्या. त्यामध्ये सविस्तर चर्चा होऊन आपल्या संविधानाने यामधूनच आकार घेतला. याच ठिकाणी 1947 साली इंग्रजांनी भारतीयांच्या हातात देशाचा कारभार दिला. हा सेंट्रल हॉल त्या इतिहासाचाही साक्षीदार आहे. आपण आपलं राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वजही याच हॉलमध्ये स्वीकारला, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदींनी आपल्या या संसदेने देशातील अनेक बदल पाहिले आहेत, असं म्हटलं आहे.


'लाल किल्ल्यावरुन मी म्हटलं होतं की...'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणामध्ये, 'या सेंट्रल हॉलने आपल्या अनेक भवाना पाहिल्या आहेत. हा सेंट्रल हॉल आपल्या आठवणींबरोबरच भावनांनी भरलेला आहे, असंही मोदी म्हणाले. याच संसदेमध्ये ट्रीपल तलाखविरोधात कायदा झाला,' असंही म्हटलं. तसेच पुढे बोलताना, 'आमचं सौभाग्य आहे की याच संसदेमध्ये आम्ही अनुच्छेद 370 पासून सुटका मिळवण्यासाठी दहशतवादाविरोधात कारवाई करणारं मोठं पाऊल उचललं,' असंही मोदींनी म्हटलं. आज जम्मू-काश्मीरने शांतता आणि विकासाच्या वाटेवर वाटचाल सुरु केली आहे, असा उल्लेख करत पंतप्रधान मोदींनी, 'लाल किल्ल्यावरुन मी म्हटलं होतं की हीच योग्य वेळ आहे,' अशीही आठवण करुन दिली.


आपल्याकडे फार मोठा वारसा


जागतिक अर्थव्यवस्थेचा विचार केल्यास भारत हा पाचव्या स्थानी आहे. लवकरच भारत अव्वल 3 मध्ये सहभागी होईल. भारताने प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली आहे. आज भारतामध्ये नवीन ऊर्जा दिसून येत आहे. गुलामगिरीच्या बेड्यांनी तरुणांच्या महत्त्वाकांशा दाबून ठेवल्या होत्या. आम्हाला नवीन लक्ष्य निश्चित करायची आहेत. आम्ही जे काही बदल करु त्यामध्ये भारतीयांच्या महत्त्वकांशांना पहिलं प्राधान्य देणं आवश्यक आहे. भारत हा चेतनेनं जागा झाला आहे. 75 वर्षांचा अनुभव आमच्याकडे आहे. यामधून आपण शिकलं पाहिजे. आपल्याकडे फार मोठा वारसा आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. 



मोठ्या कॅनव्हासवर काम केलं पाहिजे


अमृतकाळाच्या 25 वर्षांमध्ये आपण मोठ्या कॅनव्हासवर काम केलं पाहिजे. आता छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये अडकून पडण्यास आपण प्राधान्य देऊ नये. तो वेळ निघून गेला आहे. आज जगभरामध्ये आत्मनिर्भर भारताच्या मॉडेलची चर्चा आहे. आत्मनिर्भर भारताचा संकल्प पूर्ण करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. यामध्ये कोणीही अडथळा आणता कामा नये. झीरो डिफेक्ट, झीरो इफेक्ट पद्धतीने आपल्याला जगासमोर निर्मिती क्षेत्रात स्वत:ला सादर करावं लागेल, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं.



जुनी संसद न म्हणता हे नाव द्यावं


पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणामध्ये, आज आपण या वस्तूचा निरोप घेऊन नवीन संसदेत जात आहोत. हे शुभ काम आपण गणेश चतुर्थीच्या दिवशी करत आहोत. उपराष्ट्रपती आणि लोकसभा अध्यक्षांना माझी एक विनंती आणि सल्ला आहे की जेव्हा आपण नवीन संसद भवनामध्ये जाऊ तेव्हा या संसद भवनाचा मान-सन्मान कमी होतो कामा नये. म्हणून याला जुनी संसद म्हणता कामा नये. याला आपण 'संविधान सदन' असं म्हटलं पाहिजे. या माध्यमातून ही वास्तू आपल्याला कायम प्रेरणा देत राहील. ही वास्तू भावी पिढ्यांना अनमोल ठेवा म्हणून सुपूर्द करता येईल. ही संधी आपण गमावता कामा नये, असंही म्हटलं.