नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर गुरुवारी नरेंद्र मोदी दिल्लीत दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. आज संध्याकाळी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात मोदींचा हा बहुचर्चित शपथविधी सोहळा पार पडेल. या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीचे दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात केली. तसेच त्यांनी माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या समाधीचेही दर्शन घेतले. यावेळी नरेंद्र मोदी यांच्यासोबत भाजपाध्यक्ष अमित शहा हेदेखील उपस्थित होते. यानंतर मोदींनी राष्ट्रीय युद्धस्मारकालाही भेट दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी सुमारे आठ हजार पाहुणे उपस्थित राहणार आहेत. पाकिस्तान वगळता बांगलादेश, भूतान, नेपाळ, श्रीलंका, म्यानमार, थायलंड या बिमस्टेक देशांचे प्रमुखही सोहळ्याला उपस्थित असतील. शंभरहून अधिक अनिवासी भारतीय खास या शपथविधी सोहळ्यासाठी दिल्लीत दाखल होत आहेत. शपथविधी सोहळ्यानंतर राष्ट्रपती भवनात निवडक पाहुण्यांसोबत पंतप्रधान मोदी यांचे रात्रीभोज आयोजित करण्यात आले आहे. या भोजनासाठी ४८ तासांहून अधिक वेळ लागणारा दाल रायसीना हा पदार्थ तयार करण्यात येत आहे. 


दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील ( रालोआ) काही खासदारही मंत्रिपदाची शपथ घेतील. त्यामुळे मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाचा समावेश होणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. मंत्रिमंडळाविषयी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यात बुधवारी दीर्घकाळ चर्चा सुरु होती. त्यामुळे कृषी, ग्रामीण विकास, ऊर्जा, गृहनिर्माण ही महत्त्वाची खाती कोणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Live updates: