बिहारमध्ये आरोग्य सेवांच्या योजनांसाठी ऐतिहासिक दिवस- पंतप्रधान
. पंतप्रधान मोदी वायुसेनेच्या विशेष चॉपरने बरौनी पोहोचले. त्यांनी यावेळी 33 हजार कोटी रुपयांच्या योजनांचे लोकार्पण केले.
बेगूसराय : बिहारमध्ये आरोग्य सेवांच्या योजनांसाठी आज एक ऐतिहासिक दिवस असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. छपरा आणि पुर्णियामध्ये आता एक नवे वैद्यकिय बनत आहे तर भागलपूर आणि गया येथील मेडीकल महाविद्यालयांना अपग्रेड केले जात आहे. याशिवाय बिहारमध्ये पटना एम्सशिवाय आणखी एक एम्स बनविण्याचे काम सुरू असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ते आज बिहार दौऱ्यावर आहेत. बिहार सहित पूर्व भारताला पुढे नेण्यासाठी केंद्र सरकार एकामागोमाग एक पाऊले टाकत असल्याबद्दल पंतप्रधानांनी नितीश कुमार आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल लालजी टंडन, मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी हे उपस्थित होते. पंतप्रधान मोदी वायुसेनेच्या विशेष चॉपरने बरौनी पोहोचले. त्यांनी यावेळी 33 हजार कोटी रुपयांच्या योजनांचे लोकार्पण केले.
जे दु:ख तुमच्या मनात आहे, तेच माझ्या मनात आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा हल्ल्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मेट्रो प्रकल्पासाठी त्यांनी पटणावासियांचे अभिनंदन केले. पाटलिपुत्र आता मेट्रो रेल्वेशी जोडले जाणार आहेत. 13 हजार कोटी रुपयांची ही योजना सुरु करताना भविष्यात येणाऱ्या अडचणी पाहता त्यापद्धतीने विकसित करण्यात आल्या आहेत. मेट्रो प्रकल्प वेगाने विकसित होत असून पटना शहराला नवा वेग देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बिहारसहित पूर्व भारताचा कायापालट करण्याच्या निर्धाराने सुरू असलेल्या योजनेत प्रधानमंत्री उर्जा गंगा योजना देखील आहे. या योजनेच्या अंतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिसा यांना गॅस पाईप लाईनने जोडले जाणार आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्याआधी जगदीशपूर-हल्दीया पाईपलाईनच्या पटणा-फूलपूर सेक्शनचे लोकार्पण करण्यात आल्याचेही ते म्हणाले.