दहशतवादाचं कंबरडं मोडणारे मोदी म्हणतात, `ये हमारा काम करने का तरीका है`
राष्ट्रप्रेम हाच एकच मंत्र आपल्या जीवनाचा मूलमंत्र
वाराणासी : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी वाराणासी येथे भव्य रोड शोमध्ये सहभाग गेतला. यावेळी त्यांनी वाराणासीतील जनतेला अभिवादन करत त्यांच्याकडून मिळणाऱ्या सदिच्छांचा स्वीकार केला. आगामी लोकसभा निवडणूक २०१९ च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान सध्या वाराणासीमध्ये दाखल झाले असून, गंगा नदीच्या महाआरतीतही ते सहभागी झाले. ज्यानंतर त्यांनी जनतेशी संवादही साधला. दहशतवादाच्या मुद्द्यापासून काशीवासियांकडून मिळालेल्या प्रेमापर्य़ंत त्यांनी यावेळी लक्षवेधी वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं.
'पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्य़ात ४० जवान शहिद झाले होते. या हल्ल्यानंतर त्याच क्षेत्रात ४२हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे, ही आमची काम करण्याची पद्धत आहे', असं मोदी म्हणाले. दहशतवादाचं कंबरडं मोडणाऱ्या मोदींचं हे वक्तव्य पाहता त्यांनी येत्या काळातही हे सारे हल्ले परतवून लावण्याचा निर्धार व्यक्त केला. गेल्या पाच वर्षांमध्ये देशातील कोणत्याही धार्मिक स्थळावर दहशतवादी हल्ला झालेला नाही. कुंभ मेळाही सुरळीतपणे पार पडला, असं म्हणज दहशतवाद आता फक्त जम्मू आणि काश्मीरच्या काही भागांपुरताच सीमीत राहिला असल्याची बाब त्यांनी यावेळी जनतेपुढे ठेवली.
राष्ट्रप्रेम हाच एकच मंत्र आपल्या जीवनाचा मूलमंत्र असल्याचं सांगत पंतप्रधानांनी यावेळी काशीच्या जनतेचे आभारही मानले. दहशतवदात्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याचं साहसही आपल्याला या काशीनगरीकडूनच मिळाल्याचं विधान त्यांनी यावेळी केलं. भारत फक्त सहन करत आणि बोलत नाही, तर 'दहशतवादाला जशात तसं उत्तरही देतो', असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा उपस्थितांचं लक्ष वेधलं. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पूर्वसंध्येला मोदींचा हा रोड शो आणि एकंदर भाजपचं शक्तीप्रदर्शन पाहता राजकीय वर्तुळात याविषयी विरोधी पक्षांकडून प्रतिक्रिया येण्यासही सुरुवात झाली आहे.