पंतप्रधान मोदींची यंदाची दिवाळी केदारनाथमध्ये
केदारनाथमध्ये मोदी कोणतीही सभा घेणार नाहीत.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाची दिवाळी केदारनाथ मंदिरात साजरी करणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, मोदी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी मंदिरात दाखल होतील. याठिकाणी ते केदारनाथाची पूजा करतील. यानंतर मोदी या परिसरात सुरु असलेल्या कामांची पाहणी करणार असल्याचेही सांगितले जात आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमधील भारतीय जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती.
दरम्यान, मोदींच्या या केदारनाथ भेटीच्या पार्श्वभूमीवर एसपीजीचे एक पथक केदारनाथला पोहोचले आहे. याठिकाणी त्यांच्याकडून सुरक्षेचा आढावा घेतला जात आहे.
केदारनाथमध्ये मोदी कोणतीही सभा घेणार नाहीत. मात्र, ते सरस्वती नदीच्या परिसरात सुरु असलेल्या विकासकामांची पाहणी करतील, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.