नवी दिल्ली : भिकेला लागलेल्या पाकिस्तानात खैरात करून आलेल्या सौदी अरेबियाचे राजपूत्र मोहम्मद बिन सलमान भारतात नेमके कशासाठी आले होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले. दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या देशांना राजनैतिकदृष्ट्या एकाकी पाडण्याची गरज असल्याचे मोदी म्हणाले. मात्र संयुक्त निवेदन सादर करताना मोहम्मद बिन सलमान मात्र पाकिस्तानबाबत किंवा दहशतवादाबाबत चकार शब्द न उच्चारता निघून गेले. भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात पर्यटन, घरबांधणी, इनव्हेस्ट इंडिया, प्रसारण या क्षेत्रात करार झालेत. त्यामुळे या क्षेत्रात चांगली प्रगती होण्याची शक्यता असून गुंतवणूकही चांगली होणार असल्याने रोजगारीची संधी उपलब्ध होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, सौदी अरेबियाचे राजपूत्र मोहम्मद बिन सलमान पाकिस्तानचा दौरा करून ते भारतात आले आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. त्यामुळे सौदीच्या राजपुत्रांचा दौरा कुटनीतीच्या दृष्टीने महत्वपूर्ण होता. मात्र, मोहम्मद बिन सलमान काहीही न बोलता सौदी अरेबियात निघून गेलेत. तसेच सौदी राजकुमाराच्या दौऱ्यावरुन विरोधकांनी नरेंद्र मोदी यांना धारेवर धरले आहे. ज्या उत्साहाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिल्लीत विमानतळावर जात त्यांची गळाभेट करत स्वागत केले. त्यावर आता मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत.



भारतात येण्यापूर्वी सौदीचे राजपूत्र पाकिस्तानच्या दौऱ्यावर होते. तिथे त्यांनी आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानला २० अब्ज डॉलरची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली. त्यांच्या भारत दौऱ्यादरम्यानही मोठ्या गुंतवणुकीची आणि करारांची अपेक्षा केली जात आहे. भारत याप्रसंगाचा वापर पाकिस्तानला दहशतवादप्रकरणी कठोर संदेश दिला. मात्र, सौदी अरेबिया राजपुत्रांनी काहीही न बोलता मौन धारण कऱणे पंसत केले.