नवी दिल्ली : देशात 2000 रुपयांच्या नोटा बाजारातून हळूहळू संपुष्टात येत असल्याचं सरकारने ही मान्य केलंय. मंगळवारी अर्थ राज्यमंत्री डॉ.के. केशव राव यांनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांपासून 2000 रुपयांच्या नव्या नोटा छापल्या जात नाहीयेत. यासोबतच सध्या चलनात असलेल्या सर्व चलनी नोटांमध्ये 2 हजारच्या नोटांचा वाटा सातत्याने कमी होत आहे. (2000 Rs Note)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्थ मंत्रालयाच्या माहितीनुसार, मार्च 2018 अखेर बाजारात 2,000 रुपयांच्या 336.30 कोटी नोटा होत्या. या वर्षी 26 नोव्हेंबर रोजी बाजारात 2000 रुपयांच्या केवळ 223.30 कोटी नोटा चलनात उरल्या होत्या.


अर्थ मंत्रालयाच्या माहितीनुसार, मार्च 2018 अखेरीस एकूण नोटांमध्ये 2,000 रुपयांच्या नोटांचा वाटा मूल्याच्या बाबतीत 3.27 टक्के आणि 37.26 टक्के होता, जो या वर्षी नोव्हेंबरमध्ये अनुक्रमे 1.75 टक्के आणि 15.11 टक्क्यांवर घसरला. अर्थ मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, नोटा छापण्याचा निर्णय भारत सरकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) सल्ल्यानुसार आणि लोकांच्या गरजेनुसार घेते. 2018-19 या आर्थिक वर्षापासून सरकारच्या वतीने 2,000 रुपयांच्या नोटा छापण्यासाठी कोणतीही ऑर्डर दिलेली नाही.


अर्थ राज्यमंत्र्यांनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार, 2018-19 या वर्षापासून 2,000 रुपयांच्या नोटांची छपाई न केल्यामुळे एकूण चलनात घट झाली आहे. नोटा कालांतराने खराब होतात. त्यामुळेही बाजारात नोटा कमी होतात. एटीएम किंवा बँकांमधून पैसे काढताना आता 2000 रुपयांच्या नोटा फारच कमी प्रमाणात उपलब्ध असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. बँकेत जमा झालेल्या 2 हजार रुपयांच्या नोटाही आता चलनात पाठवल्या जात नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.