`प्रियंका आणि राहुल गांधींनी राजस्थानमधून निवडणूक लढवावी`
प्रियंका यांच्या सक्रीय राजकारणात प्रवेशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
नवी दिल्ली : प्रियंका गांधी-वाड्रा आणि राहुल गांधी यांनी राजस्थानमधून निवडणूक लढवावी असं राज्यस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी म्हटलं आहे. प्रियंका गांधी-वाड्रा आणि राहुल गांधी यांनी राजस्थानमधून निवडणूक लढवली तर त्यांचं राजस्थानची जनता आणि काँग्रेस स्वागतच करेलं असं त्यांनी म्हटलं आहे. प्रियंका गांधी-वाड्रा यांच्या राजकारणातील सक्रिय प्रवेशाचं स्वागत आहे. याचा परिणाम आगामी लोकसभा निडणुकांमध्ये दिसेल असंही ते म्हणाले. प्रियंका गांधी-वाड्रा यांची काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीपदी नियुक्ती झाल्यानंतर आता काँग्रेस नेत्यांकडून त्यांचं स्वागत केलं जातं आहे.
लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर असतानाच प्रियंका गांधी यांची राजकारणात एन्ट्री झाली आहे. याआधी प्रियंका गांधी पडद्याच्या मागच्या भूमिकेत होत्या. पण आता त्या काँग्रेससाठी रणनीती तयार करताना दिसतील. याआधी प्रियंका गांधी या फक्त आई सोनिया गांधी आणि भाऊ राहुल गांधी यांच्या मतदारसंघातच प्रचार करताना दिसत होत्या. पण आता त्यांची जबाबदारी वाढल्याने त्यांचं काम देखील वाढणार आहे.
प्रियंका यांच्या राजकारणात सक्रिय प्रवेशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साहाचं वातावरण आहे. प्रियंका गांधी-वाड्रा यांच्या सक्रीय राजकारणातल्या प्रवेशानंतर देशभरात त्यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. प्रियंका गांधी-वाड्रांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे. प्रियंका गांधी यांनी राजकारणात यावं अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी होती. अनेकदा काँग्रेस कार्यकर्त्यांनी जाहीररित्या याबाबत आवाज देखील उठवला. मोदींच्या लाटेनंतर अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रियंका लाओ, काँग्रेस बचावचे पोस्टर्स देखील लावले होते.