`प्रियंकांना राजकारण समजत नाही, फक्त सुंदर चेहऱ्यामुळे मतं मिळणार नाहीत`
प्रियंकांना अगदी मोक्याच्या क्षणी प्रत्यक्ष मैदानात उतरवून काँग्रेसने मास्टरस्ट्रोक खेळल्याची चर्चा आहे.
पाटणा: वाचाळवीर नेत्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे संपूर्ण पक्षाची कोंडी होणे, ही बाब आता भाजपसाठी नवीन राहिलेली नाही. या वाचाळवीरांच्या यादीत आता बिहारमधील भाजप नेते व मंत्री विनोद नारायण झा विराजमान झाले आहेत. विनोद झा यांनी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्यासंदर्भात वादग्रस्त टिप्पणी केली आहे. काही पत्रकारांनी विनोद झा यांना प्रियंका यांच्या राजकारणातील प्रवेशाविषयी प्रतिक्रिया विचारली. तेव्हा झा यांनी म्हटले की, प्रियंका या नवख्या आहेत. त्यांना राजकारणाची जाण नाही. केवळ चेहरा सुंदर आहे म्हणून लोक त्यांना मतं देणार नाहीत, असे त्यांनी म्हटले. या वक्तव्यावरून भाजप अडचणीत येण्याची शक्यता आहे.
प्रियंका गांधी मोदींविरोधात वाराणसीतून निवडणूक लढवणार?
काँग्रेस पक्षाकडून बुधवारी प्रियंका यांची महासचिवपदी नियुक्ती केली होती. तसेच त्यांच्याकडे पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवली होती. प्रियंकांना अगदी मोक्याच्या क्षणी प्रत्यक्ष मैदानात उतरवून काँग्रेसने मास्टरस्ट्रोक खेळल्याची चर्चा आहे. आतापर्यंत केवळ संघटनात्मक निर्णयांमध्ये सहभागी असणाऱ्या प्रियंका लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच सक्रियपणे सूत्रे हलवणार आहेत. पूर्व उत्तर प्रदेशमध्ये मोदी आणि योगी यांचेच मतदारसंघ येत नाहीत तर भाजप, सप आणि बसपच्या महत्त्वाच्या नेत्यांचेही मतदारसंघ येतात. रामजन्मभूमी अयोध्याही फैजाबाद मतदारसंघात आहे. सध्या सपाकडे असलेला गोरखपूर, आझमगढ, अखिलेश यादव यांचा मुबारकपूर, मायावतींनी प्रतिनिधित्व केलेला आंबेडकरनगर, केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा यांचा गाझीपूर तसेच, अलाहाबाद, देवरिया हे मतदारसंघही पूर्व उत्तर प्रदेशात येतात.
मतदार प्रियांका गांधींमध्ये इंदीराजींची प्रतिमा पाहतील- शिवसेना