उन्नाव : उन्नाव बलात्कार (Unnao Rape Case) पीडितेच्या निधनानंतर देशभरात या प्रकरणाबाबत आक्रोश व्यक्त केला जात आहे. पीडितेच्या निधनानंतर कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi Vadra) यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. पीडितेच्या मृत्यूवर त्यांनी दुख: व्यक्त केलं. मीडियाशी बोलतानी प्रियंका गांधी वाड्रा यांनी, गेल्या एक वर्षापासून संपूर्ण कुटुंबाला त्रास देण्यात येत आहे. आरोपींचं भाजपाशी काही संबंध असल्याचं ऐकण्यात आलं आहे. त्यामुळेच आरोपींना संरक्षण दिलं जात आहे. उत्तर प्रदेशमध्ये गुन्हेगारांमध्ये कोणतीही भीती राहिली नसल्याचं त्या म्हणाल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियंका गांधी वाड्रा यांनी ट्विट करत, उत्तर प्रदेश सरकारवर निशाणा साधत कायदा-व्यवस्था, पोलीसांवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये महिलांसाठी जागा आहे का? असा सवालही त्यांनी केला आहे.







पीडितेच्या भावाने आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. त्याने बहिणंचं शरीर घरासमोर दफन करुन समाधी बांधणार असल्याचं सांगितलं. त्याने आरोपींना या जगात राहण्याचा कोणताही अधिकार नाही. आता मला काहीही बोलायचं नाही. माझं केवळ एकच म्हणणं आहे की, पाचही आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, त्यापेक्षा कमी काहीही नको.


हैदराबाद सामूहिक बलात्कारप्रकरणी (Hyderabad gang rape case) आरोपींना शिक्षा मिळाली तशीच शिक्षा, या आरोपींनाही मिळावी असं पीडितेच्या वडिलांनी म्हटलं आहे. शुक्रवारी हैदराबाद सामूहिक बलात्कारप्रकरणी तेलंगणा पोलिसांनी चारही आरोपींचं एन्काऊंटर केलं. 


उन्नावमधील तरुणीवर गेल्या वर्षी सामूहिक बलात्कार करण्यात आला. बलात्कार करणाऱ्या दोन आरोपींपैकी एकाला ३० नोव्हेंबर रोजी जामीन मंजूर करण्यात आला. तर दुसरा आरोपी फरार आहे. पीडिता गुरुवारी ५ डिसेंबर रोजी सकाळी याच खटल्याच्या सुनावणीसाठी रायबरेलीला जाण्यासाठी बसवारा रेल्वे स्टेशनकडे निघाली असताना, पाच जणांनी तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यात पीडिता ९० टक्क्यांहून अधिक भाजली. त्यानंतर तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 


रुग्णालयाकडून शुक्रवारी (६ डिसेंबर) रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी पीडितेचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. शुद्धीत असेपर्यंत ती, आरोपींना सोडू नका असं सांगत होती. शुक्रवारी रात्री तिला कार्डियक अरेस्ट आला. डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही तिची मृत्यूशी झुंज अयशस्वी ठरली.