लखनऊ : काँग्रेस सरचिटणीसपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आणि काँग्रेसमध्ये आलेली मरगळ दूर सारण्यासाठी प्रियंका गांधींचा आज उत्तर प्रदेशमध्ये रोड शो सुरू आहे. या रोड शोमध्ये त्यांच्यासोबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, उत्तर प्रदेश प्रदेशाध्यक्ष राज बब्बर, पक्षाचे नेते ज्योतिरादित्य शिंदे उपस्थित आहेत. लखनऊ विमानतळ ते काँग्रेस कार्यालय असा १५ किलोमीटरचा हा रोड शो आहे. या रोड शोमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय. रोड शोसाठी रस्त्याच्या दुतर्फा कार्यकर्ते आणि लोकांची मोठी गर्दी आहे.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उल्लेखनीय म्हणजे, पूर्व उत्तर प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचा हा पहिला-वहिला रोड शो आहे. लोकसभा निवडणूक २०१९ च्या तारखा जाहीर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरलेत... अशावेळी प्रियांका गांधी यांचा हा रोड शो चर्चेचा विषय ठरलाय. 


उत्तर प्रदेशात पहिल्यांदाच प्रियांका गांधी सार्वजनिक पद्धतीनं रस्त्यावर उरतल्यात. काँग्रेस कार्यकर्त्यांना उभारी देण्याचा प्रयत्नही या निमित्तानं केला जातोय. यावेळी पक्षाचं कार्यालयही फुलांनी सजवण्यात आलंय. शहरात ठिकठिकाणी काँग्रेसचे पोस्टर झळकत आहेत. 


यावेळी, पूर्व उत्तर प्रदेशमधील ४२ मतदारसंघातील नेते आणि पदाधिकाऱ्यांची भेट प्रियांका गांधी घेणार आहेत. पुढील तीन दिवस म्हणजेच १४ फेब्रुवारीपर्यंत प्रियांका गांधी उत्तर प्रदेशात असतील.