बंगळुरू: दक्षिणेतील राजकारणी आणि त्यांच्या विचित्र तऱ्हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. या सगळ्यामध्ये आता मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे ज्येष्ठ बंधू आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रेवन्ना यांची भर पडली आहे. रेवन्ना यांना सध्या दररोज बंगळुरू ते होलेनरसिपुरा अशा तब्बल ३५० किलोमीटरचा हेलपाटा घालावा लागत आहे. एका ज्योतिषाची आज्ञा शिरसावंद्य मानून रेवन्ना हे सगळं करत आहेत. 


मंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर रेवन्ना यांना बंगळुरूत बंगला मिळणे अपेक्षित होते. मात्र, माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री महादेवप्पा या बंगल्यात अजून वास्तव्यास आहेत. बंगला खाली करण्यासाठी अद्याप त्यांच्याकडे तीन महिन्यांचा अवधी आहे. त्यामुळे रेवन्ना यांच्याकडे बंगळुरूत दुसऱ्या एखाद्या घरात राहण्याचा पर्याय होता. परंतु रेवन्ना यांना ज्योतिषाने स्वत:च्या मालकीच्या घरात न राहण्याचा सल्ला दिलाय. स्वत:च्या मालकीच्या घरात रात्री झोपल्यास वाईट वेळ सुरु होईल, असे या ज्योतिषाचे म्हणणे आहे. त्यामुळे रेवन्ना रोज फक्त झोपण्यासाठी ३५० किलोमीटरचा प्रवास करून आपल्या मतदारसंघात परत येतात. ते रोज पहाटे पाच वाजता उठतात आणि पूजा करतात. सकाळी ८ वाजता बेंगळुरुला निघण्याअगोदर ते मतदारसंघातील लोकांची भेट घेतात. सकाळी ११.३० वाजता बंगळुरुला पोहोचल्यानंतर रात्री ९ वाजता ते परतीच्या प्रवासाला निघतात. मध्यरात्री घरी पोहोचल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी तोच कार्यक्रम पुन्हा सुरु होतो.