Bhagwant Mann on Amritpal Singh Arrest: पंजाब पोलिसांनी (Punjab Police) रविवारी फरार असलेल्या अमृतपाल सिंगला (Amritpal Singh) अटक केली. गेल्या 38 दिवसांपासून अमृतपाल सिंग फरार होता. पण अखेर पोलिसांना त्याला बेड्या ठोकण्यात यश मिळालं आहे. यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Punjab Chief Minister Bhagwant Mann) यांनी यावर प्रतिक्रिया देताना काही लोक राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत होते, आम्ही त्यांच्याविरोधात कारवाई केली आहे असं म्हटलं आहे. आम्ही त्याला त्या दिवशीही पकडू शकलो असतो, पण रक्तपात किंवा गोळीबार होऊ नये अशी आमची इच्छा होती असंही ते म्हणाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भगवंत मान यांनी सांगितलं की, "काही लोकांकडून राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही माहिती मिळाल्यानंतर तात्काळ कारवाई केली. काही लोकांना पकडण्यात आलं असून काही जण अद्याप फरार आहेत. आम्ही ठरवलं असतं तर त्या दिवशी सर्वांना पकडलं असतं. पण आम्हाला रक्तपात किंवा गोळीबार व्हावा अशी इच्छा नव्हती".


पुढे ते म्हणाले की "याआधी अजनाला पोलीस स्टेशनच्या समोर पालकी साहब ज्यामध्ये गुरु ग्रंथ साहिब यांची स्वारी असते ती घेऊन आले आणि त्याची ढाल बनवत आत घुसले होते. मी त्याच दिवशी डीजीपींना काही झालं तरी गुरु ग्रंथ साहिब यांच्या सन्मानाला धक्का लागता कामा नये असे आदेश दिले होते. ना आम्ही पाण्याच्या फवाऱ्याचा मारा केला, ना एक दगडही उचलला. पण यावेळी काही पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. पंजाब पोलिसांनी संयम बाळगल्याने त्यांचं कौतुक होत आहे". 


"18 मार्चपासून आम्ही अमृतपालचा शोध घेत होतो. पोलिसांनी यादरम्यान अत्यंत संयमाने काम केलं आणि माहिती मिळताच कारवाई केली. अमृतपाल सिंग गेल्या 35 दिवसांपासून फरार असताना पंजाबमध्ये मात्र शांतता कायम होती. पंजाबमधील लोकांनी काळे दिवस पाहिले असून आता तशी स्थिती नाही. आता पंजाब देशाचं नेतृत्व करेल," असं भगवंत मान म्हणाले. राज्यातील साडे तीन कोटी जनतेचं रक्षण करणं आमची जबाबदारी असून, आम्ही ती निभावत राही असं आश्वासन त्यांनी दिलं. 


"मी पूर्ण रात्रभर झोपलो नव्हतो. दर 15 मिनिटं, अर्ध्या तासाने मी माहिती घेत होतो. रक्तपात व्हावा, कायदा-सुव्यवस्था बिघडावी अशी माझी इच्छा नव्हती. साडे तीन कोटी लोकांसाठी मला माझी झोप गमवावी लागली असेल तर त्यात इतकं काही नाही," असंही ते म्हणाले.


अमृतपालने नेमकं काय केलं होतं?


23 फेब्रुवारीला अमृतपाल सिंग चर्चेत आला होता. त्याने आपल्या काही सहकाऱ्यांना सोडवण्यासाठी हजारो समर्थकांसह अजनाला पोलीस स्थानकावर हल्ला केला होता. यामध्ये सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. यानंतर त्याने काही वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत वेगळ्या खलिस्तानची मागणी केली होती. इतकंच नाही तर अमृतपालने देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनाही धमकी दिली होती. 


कोण आहे अमृतपाल सिंग ?


अमृतपाल सिंग हा 'वारिस पंजाब दे' या संघटनेचा प्रमुख आहे. खलिस्तान या वेगळ्या देशाची त्याची मागणी आहे. तो दुबईहून परतला आहे. 'वारिस पंजाब दे' ही संघटना पंजाबी अभिनेता दीप सिद्धूने तयार केला आहे. दीप सिद्धूच्या मृत्यूनंतर अमृतपाल सिंगने संघटनेचा ताबा घेतला. त्याने भारतात येऊन लोकांना संघटनेशी जोडण्याचा प्रयत्न केला. अमृतपाल आयएसआयशी जोडल्याचा आऱोप आहे.