पाकिस्तानची कोंडी करण्याचा भारताचा डाव, सचिन तेंडुलकरने दिली ही प्रतिक्रियी
पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानसमवेत क्रिकेट खेळू नये, असा सूर सध्या देशभरात उमटत आहे.
मुंबई : भारताने पाकिस्तानसमवेत क्रिकेट खेळू नये, असा सूर सध्या देशभरात उमटत आहे. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मात्र पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यास अनुकूलता दर्शवली आहे. विश्वचषकात पाकिस्तानशी दोन होत करुन त्यांना धूळ चारण्याची परंपरा भारताने कायम राखावी. आपण पाकिस्तानशी खेळलो नाही तर त्यांना फुकट दोन गुण मिळतील आणि मला ते अजिबात आवडणार नाही, असे सचिनने म्हटले आहे. माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्यापाठोपाठ सचिननेही पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्याच्या बाजूने कौल दिला आहे. दरम्यान माझ्यासाठी देश सर्वात प्रथम आहे आणि देश जो निर्णय घेईल, तोच योग्य असेल असेही सचिनने स्पष्ट केले आहे.
'पाकिस्तानची विश्वचषकातून हकालपट्टी करा'
पाकिस्तानची विश्वचषकातून हकालपट्टी करावी अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या क्रिकेट प्रशासकांनी केली आहे. या संबंधी तयार करण्यात आलेलं पत्र परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयाला पाठवण्यात येणार आहे. पाकिस्तानची विश्वचषकातून हकालपट्टी करावी नाही तर भारत पाकिस्तानशी विश्वचषकात खेळणार नाही, असा इशारा पत्रातून देण्यात येणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने प्रशासकांच्या समितीत तिसऱ्या सदस्याची नियुक्ती केली. नागपूरमध्ये स्थीत लेफ्टनंट जनरल रवींद्र थोडगे यांना प्रशासकांच्या समितीत नियुक्त कऱण्यात आले आहे. ७ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत आयसीसीची बैठक दुबईतल्या मुख्यालयात होणार आहे. त्या बैठकीत भारत पाकिस्तानच्या हकालपट्टीची मागणी रेटणार आहे. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर कोंडी करण्याची भारताची भूमिका आहे. प्रत्येक क्षेत्रात पाकिस्तानला एकटे पाडून कोंडून मारण्याचा भारताने चंग बांधला आहे. त्याचाच हा एक भाग आहे.