पुलवामा दहशतवादी हल्ला : आत्मघातकी हल्ल्याचं सोमालिया कनेक्शन
गुरुवारी दक्षिण काश्मीरच्या पुलवामात सीआरपीएफ जवानांना घेऊन जाणाऱ्या एका बसवर आत्मघातकी हल्ला घडवून आणण्यात आला
नवी दिल्ली / श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा भागात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आत्तापर्यंत सीआरपीएफच्या ४४ जवान शहीद झाल्याचं वृत्त हाती येतंय. या हल्ल्यात आता आफ्रिकी देश असलेल्या सोमालियाचं कनेक्शनही समोर येतंय.
जम्मू काश्मीर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी एका खाजगी ट्विटर अकाऊंटवर अपलोड करण्यात आलेली गुप्त सूचना सुरक्षा एजन्सीलाही दिली होती. यामध्ये पाकिस्तानची दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदनं सुरक्षा दलावर आत्मघातकी हल्ला करण्याची धमकी दिली होती.
व्हिडिओ आणि पुलवामा दहशतवादी हल्ला
राज्य पोलिसांनी दिलेली ही गुप्त माहिती ट्विटर हॅन्डलशी निगडीत होती. यामध्ये एक केवळ ३३ सेकंदाचा व्हिडिओ दिसतोय. ज्यामध्ये दहशतवादी सोमालियात जवानांवर हल्ला करताना दिसत आहेत. धक्कादायक म्हणजे, या व्हिडिएओत ज्या पद्धतीनं दहशतवादी हल्ला होताना दिसतोय तसाच हल्ला गुरुवारी दक्षिण काश्मीरच्या पुलवामात सीआरपीएफ जवानांना घेऊन जाणाऱ्या एका बसवर करण्यात आला.
अधिक वाचा :- पुलवामा दहशतवादी हल्ला : 'तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहचेपर्यंत मी जन्नतमध्ये पोहचलो असेन'
श्रीनगरपासून अवघ्या ३० किलोमीटर दूर अंतरावर अवंतीपोरा बागात दहशतवाद्यांनी या ताफ्यावर पहिल्यांदा गोळीबार केला. स्फोटकांनी भरलेली एक 'एसयूव्ही' गाडी जवानांच्या एका बसवर धडकली... आणि मोठा स्फोट घडवून आणण्यात आला. या हल्ल्यात एका बसचे आणि त्यातून प्रवास करणाऱ्या जवानांचे अक्षरश: तुकडे-तुकडे उडाले. हल्ल्यासाठी दहशतवाद्यांना तब्बल ३५० किलो आयईडी स्फोटकांचा वापर केला होता. सीआरपीएफचा ताफा जात असलेल्या एका कारमध्ये ही स्फोटके भरून ठेवण्यात आली होते. या दहशतवादी हल्ल्यात ४४ जवान शहीद झालेत.
आफ्रिकी देश असलेल्या सोमालियात दहशतवादी आपले पाय पसरत असल्याचं समोर येतंय. सोमालियाची राजकीय स्थिती सतत अस्थिर असते. त्यामुळे इथं शबाबसारखे क्रूर दहशतवादी संघटनाही कार्यरत आहेत. इथून 'अलकायदा'सारख्या संघटनाही जगभरात दहशतवाद पसरवत आहेत.