नवी दिल्ली : पुलवामा दहशतवादी हल्ला करण्यासाठी लष्करी वापराच्या ए पाच ग्रेडच्या आरडीएक्सचा वापर झाला असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे आरडीएक्स सीमा ओलांडून आल्यावर महिला आणि मुलांच्या सहाय्याने छोट्या छोट्या प्रमाणात त्याची वाहतूक केली गेली असल्याचेही समजत आगे. त्यानंतर या आरडीएक्सची पुलवामा इथे साठवण करण्यात आली. एसयुव्हीमध्ये तब्बल ३०० किलो आरडीएक्स भरण्यात आले होते. 


हल्ल्यासाठी अशी केली तयारी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुलवामा आत्मघाती हल्ला करणाऱ्या व्यक्तीने एसयुव्ही चालवण्याचे खास प्रशिक्षण घेतले होते. तसेच एसयुव्हीमध्ये अंतर्गत बदल करून तीन ड्रम ठेवण्याची जागा तयार करण्यात आली होती. या ड्रममध्ये जवळपास ३०० किलो आरडीएक्स साठविण्यात आले. जेणेकरुन कोणाला याचा संशय येता कामा नये. दरम्यान, गाडीमध्ये हे बदल करताना कोणाला काहीही संशय कसा आला नाही? पुलवामा दहशतवादी हल्ला हा एका फार मोठ्या पाकिस्तानी कटाचा परिपाक होता हे 'झी मीडिया'च्या हाती लागलेल्या माहितीवरून सिद्ध होत आहे.


हल्ल्यात थेट पाकिस्तानचा हात


हल्ल्यासाठी पाकिस्तानची सर्वतोपरी मदत करण्यात आली. दहशतवाद्यांकडून महिला आणि मुलांचा वापर करण्यात आला. त्यामुळे कोणाला याचा संशय आला नाही. एवढी दहशतवाद्यांनी खबरदारी घेतल्याचे पुढे आले आहे. तब्बल ३०० किलो आरडीएक्सचा स्फोट घडवून सीआरपीएफच्या ताफ्यावर भ्याड हल्ला करण्यात आला. मात्र पुलवामा इथल्या छोट्याशा गावात हा एवढा मोठा साठा आला कसा? झी मीडियाकडे सूत्रांच्या माध्यमातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. तब्बल ३०० किलो आरडीएक्स. पाकिस्तानच्या थेट सहभागाशिवाय स्थानिक पातळीवर दहशतवाद्यांना हे करणंच शक्य नव्हते. एनआयएने जमा केलेल्या नमून्यांमध्ये लष्करी वापराचे आरडीएक्स या हल्ल्यासाठी वापरल्याचे उघड झाले आहे.



 महिला आणि लहान मुलांचा वापर


विशेष म्हणजे हे आरडीएक्स सीमेपलीकडून भारतात आल्यावर पुलवामा भागात आणण्यासाठी स्थानिक पातळीवर महिला आणि मुलांचा वापर केल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. लष्करातल्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ए५ ग्रेडचे म्हणजेच लष्करी वापराचे आरडीएक्स हल्ल्यासाठी वापरण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून थोड्या थोड्या प्रमाणात हे आरडीएक्स सीमेपलीकडून भारतात येत होतं. याचं वहन करण्यासाठी महिला आणि लहान मुलांचाही वापर झाल्याची माहिती स्थानिक सूत्रांकडून मिळाली आहे. 


ही तयारी सुरू असतानाच इथे सुरू होता आत्मघाती हल्ल्यासाठी व्यक्तीचा शोध. त्यासाठी कामरान हा जैश ए मोहम्मदचा कमांडर भरती करत होता. आदिल दार याची या कामासाठी निवड झाल्यावर त्याला एसयुव्ही चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.एसयुव्हीमध्ये काही बदल करण्यात आले होते. एसयुव्हीमध्ये ३ पिंप मावतील एवढी जागा करण्यात आली. या पिंपांमध्ये तब्बल ३०० किलो आरडीएक्स अमोनिअम नायट्रेटसह भरण्यात आले होते.  



पाकिस्तानची आयईडीसाठी मदत !


मात्र आरडीएक्सने भरलेले ड्रम बसला धडकवून उपयोग नव्हता. स्फोट घडवून आणण्यासाठी आयईडी तयार करण्यात आले. त्यासाठी पाकिस्तानी आयईडी एक्स्पर्टची मदत घेण्यात आली. आयईडी बनवण्याचे कामही काही दिवस सुरू असल्याचे समोर येते आहे. स्फोटकांसाठी डिटोनेटर्स आणि फ्यूज सीमेपलीकडून आणण्यात आले.


एक सूत्रधार पाकिस्तानात पळून गेला


पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हा हल्ला पाकिस्तानी आर्मीच्या मदतीने घडवून आणला. हल्ल्याच्या अवघे काही दिवस आधी या हल्ल्याचा एक सूत्रधार पाकिस्तानात पळून गेला. कामरान या जैशच्या कमांडरने आत्मघाती हल्ल्यासाठी सावज शोधणे, स्फोटकांच्या वहनासाठी महिला आणि मुलांना नेमणे ही कामं केली. कामरानसह या हल्ल्यासाठी आणखी दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मदत केली. मोहम्मद ओमर आणि मोहम्मद इस्माईल या हल्ल्यासाठी कामरानची साथ दिली. त्यापैकी ओमर हा जैशचा म्होरक्या अझर मसूदचा भाचा असल्याचं सांगितलं जातंय. तर ईस्माईल हा निवृत्त अधीक्षक शेख गुलाम मोहम्मद यांच्यावरील हल्ल्यातला प्रमुख आरोपी आहे. या हल्ल्याचा संपूर्ण कट हा अझर मसूदचा भाऊ इब्राहीम अझर सुलेमान याच्या नेतृत्वाखाली रचण्यात आला अशी सूत्रांची माहिती आहे. 


८१४ विमानाचा प्रमुख अपहरणकर्ता 


यातला डॉ. सुलेमानचे नाव तुम्हाला ऐकल्यासारखे निश्चितच वाटत असेल. तर डॉ. सुलेमान हा मसूद अझरचा भाऊ इंडियन एअरलाईन्सच्या आयसी ८१४ विमानाचा प्रमुख अपहरणकर्ता आहे. त्यामुळे या हल्ल्यात वापरलेला आत्मघाती दहशतवादी केवळ काश्मीरातला असला तरी कट रचण्यापासून ते स्फोटकांपर्यंत सर्वच गोष्टी पाकिस्तानातून आणल्याचं सूत्रांच्या माहितीतून उघड होतंय. त्यामुळे पाकिस्तानी पंतप्रधान कितीही बोंबाबोंब करत असले तरी पाकिस्ताननेच हा कट घडवल्याचा दावा सत्यच आहे यात शंका नाही