Punish For Holding Bhabi's Hand: बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यामध्ये एक अजब घटना घडली आहे. येथे एका किरकोळ कारणावरुन काही लोकांनी तरुणाला बेदम मारहाण केली. त्यानंतर या तरुणाच्या डोक्यावरील केस कापले. समोर आलेल्या माहितीनुसार बनमनखी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील धोकरधारा येथे हा संपूर्ण प्रकार घडला. 100 लोकांनी या तरुणावर एकाच वेळी हल्ला केला. या घोळक्याने तरुणाला चारही बाजूंनी घेरलं आणि त्याला उठाबशा काढायला लावल्या. त्यानंतर त्याला बेदम मारहाण केली. लोकांचं एवढ्याने समाधान झालं नाही म्हणून या तरुणाचं मुंडन करुन त्याला सोडलं.


व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तक्रार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही मारहाण झाली त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या बघ्यांनी या घटनेचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये शूट केला. नंतर यापैकी काही व्हिडीओ व्हायरल झाले. मागील काही दिवसांपासून बिहारमध्ये या व्हायरल व्हिडीओंची चर्चा आहे. हे व्हिडीओ व्हायरल झालेले असतानाच दुसरीकडे व्हिडीओमधील पीडित तरुणाची ओळख पटली. अनस नावाच्या या तरुणाने पूर्णिया येथील पोलीस अधिक्षकांच्या कार्यालयामध्ये तक्रार दाखल करत आपल्याला न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. एसपी आमीर जावेद यांनी ही घटना फारच निंदनीय आहे असं म्हटलं आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषींना नक्कीच शिक्षा होईल असं पोलीस अधिक्षकांनी सांगितलं आहे.


हात पकडलेल्या अवस्थेत गावकऱ्यांनी हटकलं अन्...


पीडित तरुणाने दिलेल्या माहितीनुसार तो भागलपूर जिल्ह्यातील खरीक मिर्झापूरमधील रहिवाशी आहे. मोहरमसाठी तो बनमनखी येथील धोकरधारा येथे आपल्या वहिनीच्या घरी आला होता. धोकरधारा येथील आपल्या वहिनीच्या घरी आलेला अनस नावाचा हा तरुण तिच्याबरोबर गावातील जत्रेत गेला होता. जत्रेमध्ये गर्दी असल्याने त्याने आपल्या वहिनीचा हात पकडला. मात्र यावरुनच गावामध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला. काही गावकऱ्यांना अनिसला वहिनीचा हात पकडलेल्या अवस्थेतच हटकलं. या दोघांमध्ये नियमबाह्य संबंध असल्याचा आरोप करत सर्वांनी अनिसला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याला उठाबशा काढायला लावल्या. त्याच्या डोक्यावरील केसही काढून टाकले. त्याला मारहाण करुन पुन्हा त्याच्या गावी पाठवण्यात आलं. 


मी समजावण्याचा प्रयत्न केला पण..


मात्र पुढील काही दिवसामध्ये या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर या पीडित तरुणाने पोलिसांकडे तक्रार केली. या तरुणाचा मित्र रिझवानने आपण जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला असं सांगितलं. मात्र लोक माझं काहीही ऐकून घेण्यास तयार नव्हते. त्यांनी माझ्या मित्राला कारण नसताना मारहाण केली. दोषींवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी रिझवानने केली आहे.