चंदीगड : Punjab  govt jobs : पंजाबमध्ये 'आप'चे सरकार स्थापन झाले आहे. मुख्यमंत्री भगवंत मान (CM Bhagwant Mann) यांनी आज मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फायदा तरुणांना होणार आहे. पंजाबमध्ये 25,000 सरकारी नोकरीची भरती करणार आहे. याबाबत आजच्या मंत्रिमंडळात महत्वाचा निर्णय घेतला आहे. यापैकी पोलीस दलात 10,000 नोकऱ्या उपलब्ध करण्यात येणार आहे. भगवंत मान यांनी पंजाबमधील तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. पहिल्याच मंत्रिमंडळात भगवंत मान यांनी तरुणांना दिलेले वचन पूर्ण केले आहे.


सुशिक्षित बेरोजगारांना 'आप'चा पहिला 'मान'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भगवंत मान सरकारच्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक शनिवारी पंजाबमध्ये झाली. या बैठकीत राज्यातील 25 हजार रिक्त पदांवर तातडीने भरती प्रक्रिया सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. विविध मंडळे, महामंडळे, शासकीय कार्यालयात ही पदे रिक्त आहेत. मंत्रिमंडळाने तीन महिन्यांसाठी मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबचा वार्षिक अर्थसंकल्प जून महिन्यात सादर करण्याचा निर्णयही घेण्यात आला. यासोबतच मंत्रिमंडळाने पूरक अनुदानालाही मंजुरी दिली आहे.



मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, 25 हजार रिक्त पदांवर नियुक्ती सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यापैकी पंजाब पोलिसांत 10 हजार पदे रिक्त आहेत. तर राज्यातील इतर विभागांमध्ये 15 हजार पदे रिक्त आहेत. ही पदे तातडीने भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या भरतीसाठी लवकरच जाहिराती देण्यात येणार असून, ही संपूर्ण प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल.


भ्रष्टाचाराविरोधात मोहीम


पंजाबमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने दणदणीत विजय मिळवला. राज्यातील 117 पैकी 92 जागा जिंकून पक्षाने इतर राजकीय पक्षांचा सफाया केला. राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भगवंत मान यांनी 16 मार्च रोजी भ्रष्टाचाराविरोधात मोहीम सुरू करण्याची घोषणा केली होती.


23 मार्चला शहीद भगतसिंग यांच्या पुण्यतिथीनिमित्त हेल्पलाइन सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्यावर कोणतीही व्यक्ती भ्रष्टाचाराशी संबंधित आपली तक्रार करू शकते. मुख्यमंत्री स्वत: या हेल्पलाइनवर लक्ष ठेवणार आहेत. या महत्त्वपूर्ण घोषणेनंतर आता त्यांनी 25 हजार रिक्त पदे भरण्याची घोषणा केली आहे.