नवी दिल्ली : पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांची पत्नी प्रिनित कौर यांची फसवणूक झाल्याचं प्रकरण समोर येतंय. प्रिनित कौर यांच्या बँक अकाऊंटमधून तब्बल २३ लाख रुपये लंपास करण्यात आलेत. मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांची पत्नी प्रिनित कौर या खासदार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झारखंडच्या जामताडाच्या एका सायबर ठगानं प्रिनित कौर यांना आपल्या निशाण्यावर घेतल्याचं पोलीस तपासातून समोर आलं. पोलिसांनी अताउल अन्सारी नावाच्या इसमाला जामताडाहून अटक केलीय. 


अताउल अन्सारी हा जामताडाच्या करमाटाड पोलीस स्टेशन हद्दीतील फोफनादचा रहिवासी आहे. त्याला अटक करून पंजाबमध्ये नेण्यात आलंय. आरोपीकडून सात महागडे मोबाईल, अनेक बँकांचे एटीएम कार्ड तसंच पासबुक जप्त करण्यात आलेत. 


मिसेस मुख्यमंत्री प्रिनित कौर स्वत: खासदार आहेत

बँकेचा अधिकारी असल्याचं भासवून अन्सारीनं चक्क मुख्यमंत्र्यांच्या बायकोलाच चुना लावला. अन्सारीनं प्रिनित कौर यांच्याकडून सीसीव्ही आणि पासवर्डसहीत सगळी माहिती घेतली. ही माहिती सॅलरी अकाऊंटमध्ये टाकण्यासाठी घेत असल्याचं त्यानं बतावणी केली... आणि मिसेस मुख्यमंत्रीही त्याच्या या बोलण्याला भुलल्या. 


अताउल अन्सारी गेल्या तीन दिवसांपासून या मिसेस मुख्यमंत्र्यांच्या बँक अकाऊंटमधून पैसे काढत होता. हे लक्षात आल्यानंतर प्रिनित कौर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.



उल्लेखनीय म्हणजे, जामताडामध्ये याआधीही अनेक सायबर फसवणुकीची प्रकरणं उघड झालीत. अनेकदा व्हीआयपी लोकांना निशाण्यावर घेण्यात आल्याचंही समोर येतंय. अताउल अन्सारी विरोधात पंजाबच्या पटियालामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.