मुंबई : बहुस्तरीय मार्केटिंग घोटाळा म्हणून समोर आलेल्या क्यूनेट घोटाळा प्रकरणी सायबराबाद पोलिसांकडून जवळपास ३८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सायबराबाद पोलिसांच्या अख्त्यारित येणाऱ्या विविध पोलीस स्थानकांमध्ये हे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. 
सायबराबाद पोलीस आयुक्त व्ही.सी. सज्जनार यांनी मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार ग्रेटर हैदराबाद येत असणाऱ्या हद्दीतील तीन पोलीस स्थानकांमध्ये या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार विहान डिरेक्ट सेलिंग प्रायव्हेट लिमिटेड (क्यूनेट) आणि त्याची प्रसिद्धी करणाऱ्यांविरोधात कारवाईचं हे पाऊल उचलण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संबंधित कंपनीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावल्याबद्दल कलाविश्वातील बऱ्याच सेलिब्रिटींनाही यासंबंधीची नोटीस बजावण्यात आली आहे. अनिल कपूर, शाहरुख खान, बोमन इरानी, विवेक ओबेरॉय, पूजा हेगडे, अल्लू सिरीश यांना याप्रकरणी नोटीस पाठवण्यात आली आहे. 


अनिल कपूर, बोमन इरानी आणि शाहरुख खान या कलाकारांनी त्यांच्या वकिलांमार्फत सदर नोटीसचं उत्तरही दिलं असल्याचं कळत आहे. पण उर्वरित सेलिब्रिटींचं उत्तर अद्यापही प्रतिक्षेत आहे. तिन्ही सेलिब्रिटींकडून आलेल्या उत्तराची अभ्यासपूर्वक तपासणी केली जात असल्याची माहिती सज्जनार यांनी दिली. 


'द न्यू इंडियन एक्स्प्रेस'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार 'क्यूनेट' घोटाळ्याप्रकरणी जवळपास प्रसिद्धीत सहभागी असणाऱ्या ५०० जणांना नोटीस पाठवण्यात आली असून, त्यांच्या उत्तराची प्रतिक्षा असल्याचंही सज्जनार म्हणाले. 


भारतातील 'क्यूआय' समूहाची एक शाखा असणाऱ्या 'विहान'तर्फे हा घोटाळा करण्यात आला आहे. जे क्यूनेट या नावाने मार्केटिंग करतं. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार विहानला यापूर्वी 'गोल्ड क्वेस्ट एँड क्वेस्ट' या नावाने ओळखलं जात होतं. जी 'क्यूआय' समुहाच्या हाँगकाँगस्थित एका थेट विक्री प्रणाली किंवा बहुस्तरीय विपणन कार्यप्रणालीवर काम करणारी कंपनी आहे. या कंपनीकडून सॉफ्टवेअर कर्मचारी, बेरोजगार तरुण वर्ग आणि गृहिणींना निशाणा करण्यात येत होतं. 


'विहान' बंद करण्याची प्रक्रिया सुरु 


कॉर्पोरेट कार्य मंत्रालय म्हणजेच 'एमसीए'कडून मिळालेल्या माहितीनुसार विहान बंद करण्याच्या उद्देशाने पावलं उचलण्यास सुरुवात करण्यात आली आहे, तर, सज्जनार यांनीही क्यूनेटच्या कोणत्याही कार्यपद्धतीत सहभागी न होण्याचं आणि कोणत्याही प्रकारची आर्थिक देवाणघेवाण न करण्याचं आवाहन सर्वांना केलं आहे. 


त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार रजिस्ट्रार ऑफ कंपनीज म्हणजेच (आरओसी) बंगळुरूने विहान बंद करण्यासाठीची याचिका नॅशनल लॉ ट्रिब्युनल (एनसीएलटी) बंगळुरु येथे दाखल केली होती. 


ई कॉमर्सच्या नावाखाली भारतातून करोडो रुपये बाहेर गेले 


The Financial Frauds Victims Welfare Associationच्या हाती आलेल्या माहितीवरुन हाती आलेल्या आकडेवारीनुसार डायरेक्ट सेलिंग आणि ईक कॉमर्सच्या नावाखाली भारतातून जवळपास २० हजार कोटी रुपये बाहेर पाठवले गेले आहेत. 


दरम्यान, क्यूनेटकडून मात्र हे सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत. व्यवसायाविषयी जाण नसल्याच्या अभावी असे आरोप करण्यात येत असल्याचं या कंपनीचं म्हणणं आहे. या अहवालाविरोधात याचिका दाखल केल्याचंही कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. 


क्यूनेट ही एक ई- कॉमर्स कार्यप्रणालीअंतर्गत काम करणारी आशियाई डायरेक्ट सेलिंग कंपनी आहे. ज्यामध्ये होम केअर, बर्सनल केअर, स्किन केअर, हेल्थ, फूड, हॉलिडे पॅकेज अशा स्तरांवर उच्च प्रतीच्या उत्पादनांची विक्री करण्यात येते. ही कंपनी भारतात त्यांच्या शाखांच्या माध्यमातून कार्यरत आहे.