`विरोधक मारले जातील पण सत्य जिवंत राहील` राफेल प्रकरणी सेनेचा भाजपावर निशाणा
राफेल करारावरुन शिवसेनेनं पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला.
मुंबई : राफेल करारावरुन शिवसेनेनं पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला. सत्यमेव जयते हाच देश जिवंत ठेवण्याचा मंत्र आहे. विरोधक मारले जातील, पण सत्य जिवंत राहील. बाके बडवून सत्य मरणार का?, असा सवाल शिवसेनेनं भाजपाला केलाय. राफेलच्या नव्या कराराच्या प्रक्रियेत संरक्षण मंत्रालयाला डावलून पंतप्रधान कार्यालयानं केलेल्या हस्तक्षेपाला संरक्षण मंत्रालयानं तीव्र आक्षेप घेतला होता, असं वृत्त शुक्रवारी प्रकाशित झालं होतं. या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून निशाणा साधला.
राफेल करार हा हवाई दलाच्या बळकटीकरणासाठी झाला की एका गाळात बुडालेल्या उद्योगपतीच्या बळकटीकरणासाठी झाला? असा प्रश्न सामनातून उपस्थित करण्यात आला आहे. राफेलच्या व्यवहारात थेट आपले मोदीच ‘डील’ करीत होते. संरक्षणमंत्री, संरक्षण सचिव वगैरे प्रमुख मंडळीना या व्यवहारापासून लांब ठेवले गेले. राफेलच्या किमती ठरवण्यापासून ते हे कंत्राट कुणाला द्यायचे याबाबतचे सर्व निर्णय मोदी यांनीच घेतल्याचे सांगत आरोप व टीकेचे धनी त्यांना व्हावेच लागेल असा टोलाही 'सामाना'तून लगावण्यात आला आहे.
‘चौकीदार चोर है’
‘चौकीदार चोर है’ हा नारा राहुल गांधी यांनी दिला व तो देशाच्या कानाकोपर्यात पोहोचला. यास काँग्रेस जबाबदार नाही तर राफेल प्रकरणातली आता उघड झालेली लपवाछपवी कारणीभूत असल्याचेही शिवसेनेने म्हटले आहे.
सत्य जिवंत राहील
व्यवहारात भावना नसते. राफेलमध्ये व्यवहार आहेच हे पुराव्यानिशी उघड झाल्याचेही सेनेने म्हटले आहे. उगाच विरोधकांना दोष का देता? ‘सत्यमेव जयते’ हाच देश जिवंत ठेवण्याचा मंत्र आहे. विरोधक मारले जातील, पण सत्य जिवंत राहील असे सूचक विधानही सेनेने केले आहे. यावर भाजपाच्या गोटातून काय उत्तर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.