आत्मसंतुष्टी टाळा आणि कामाला लागा - रघुराम राजन
भारत खूप काही करू शकतो, परंतु यासाठी देशाला आत्मसंतुष्टीपासून दूर राहावं लागेल, असं भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटलंय.
नवी दिल्ली : भारत खूप काही करू शकतो, परंतु यासाठी देशाला आत्मसंतुष्टीपासून दूर राहावं लागेल, असं भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटलंय.
आपल्या 'आय डू व्हॉट आय डू : ऑन रिफॉर्म्स रिटोरिक अॅन्ड रिझॉल्व्ह' या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते. जगात आमच्यासारखं श्रेष्ठ कोणी नाही आणि आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत, ही धारणा सोडून द्यावी लागेल असंही त्यांनी म्हटलंय.
भारतासमोर अनेक संधी आहेत आणि येणाऱ्या काही वर्षांत आपण खूप काही करू शकतो... हा विश्वास ठेवा की आपण करू शकतो परंतु, याचा गर्व बाळगू नका, असंही त्यांनी म्हटलंय.
भारताचा घसरलेल्या जीडीपी दराविषयी बोलताना त्यांनी एकप्रकारे सरकारवर निशाणा साधला. त्रासदायक प्रश्न टाळायचे असतील तर कमीत कमी आश्वासनं देऊन जास्तीत जास्त काम करण्यावर लक्ष द्यावं लागेल, असा टोला त्यांनी सरकारला हाणला.
आपण कधीही नोटबंदीचं समर्थन केलं नव्हतं... इतकंच नाही तर मोदी सरकारला याच्या दुष्परिणांबाबत आपण अगोदरच सतर्क केलं होतं, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय.