Rahul Gandhi Aplogoy to Ghulam Nabi Azad: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी दिग्विजय सिंग (Digvijay Singh) यांनी पुलवामा हल्ला आणि सर्जिकल स्ट्राइकसंबंधी (Surgical Strike) केलेल्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. दिग्विजय सिंग यांच्या विधानाशी आपण सहमत नसल्याचं राहुल गांधी म्हणाले आहेत. राहुल गांधींनी सांगितलं की "माझा देशातील लष्करावर पूर्ण विश्वास आहे. लष्कराने केलेल्या कारवाईचा पुरावा देण्याची गरज नाही". इतकंच नाही तर राहुल गांधी यांनी यावेळी पक्षाला सोडचिठ्ठी देणारे गुलाम नबी आझाद यांची माफी मागितली आहे. ते म्हणाले की "जर मी कधी गुलाम नबी आझाद आणि चौधरी लाल सिंह यांना दुखावलं असेल तर त्यांची माफी मागतो". 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी सर्जिकल स्ट्राइकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. ते म्हणाले होते की "सीआरपीएफचे 40 जवान पुलवामात शहीद झाले होते. सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे सर्व जवानांना एअरलिफ्ट करण्याची विनंती केली होती. पण मोदींनी नकार दिला. अशी चूक कशी झाली?". आजपर्यंत पुलवामासंबंधी संसदेत कोणताही रिपोर्ट सादर करण्यात आलेला नाही. सर्जिकल स्ट्राइक केल्याचं सांगतात पण पुरावा देत नाहीत. भाजपा फक्त खोटारडेपणा करत आहे असा आरोपही त्यांनी केला. 


गुलाम नबी आझाद यांच्याबाबत काय म्हणाले राहुल गांधी?


गुलाम नबी आझाद यांनी भारत जोडो यात्रेसाठी आमंत्रण न देण्याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा राहुल गांधी म्हणाले "त्यांच्या पक्षातील अनेक लोक आमच्यासोबत आहेत. 90 टक्के लोक तर काँग्रेसमध्ये सहभागी झाले आहेत. दुसऱ्या बाजूला फक्त गुलाम नबी आझाद राहिले आहेत. मी त्यांचा सन्मान करतो. जर मी त्यांना दुखावलं असेल तर माफी मागतो". गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसमधून राजीनामा देत आपला पक्ष स्थापन केला होता. पण त्यांच्या पक्षातील अनेकजण पुन्हा काँग्रेसमध्ये परतले आहेत. 


दिग्विजय सिंग यांचं वैयक्तिक मत - राहुल गांधी


राहुल गांधींच्या नेतृत्वातील 'भारत जोडो' यात्रा सध्या जम्मू काश्मीरमध्ये आहे. राहुल गांधी यांनी जम्मू काश्मीरमध्ये पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांना दिग्विजय सिंग यांनी केलेल्या विधानासंबंधी विचारण्यात आलं. यावेळी त्यांनी मी त्यांच्या मताशी सहमत नसून, लष्करावर पूर्ण विश्वास असल्याचं म्हटलं. 


राहुल गांधींनी यावेळी भाजपाला लक्ष्य करताना म्हटलं की "काँग्रेस पक्षाने देशाला स्वातंत्र्य दिलं आहे. देशात अनेक संस्था उभारल्या आहेत. जेव्हा आम्ही इंग्रजांशी लढत होतो तेव्हा भाजपा आणि आरएसएसचे लोक इंग्रजांच्या बाजूने उभे होते".