नवी दिल्ली : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची विनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा आज होणार आहे. 


राहुल गांधींची बिनविरोध निवड


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारी म्हणजेच १६ डिसेंबरला राहुल गांधी पक्षप्रमुखपदाची सूत्रे औपचारिकपणे स्वीकारतील असे पक्षाच्या सूत्रांकडून रविवारी सांगण्यात आलं आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्जमागे घेण्याचा आज ११ डिसेंबर हा शेवटचा दिवस आहे. 


 राहुल गांधी एकमेव उमेदवार


अध्यक्षपदासाठी राहुल गांधी हे एकमेव उमेदवार असून, त्यांच्या वतीने दाखल केलेले सर्व ८९ उमेदवारी अर्ज छाननीमध्ये वैध ठरलेत. त्यामुळे काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मुल्लापल्ली रामचंद्रन आणि सदस्य मधुसूदन मिस्त्री तसेच भुवनेश्वर कलिता राहुल गांधी यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा आज करतील, अशी अपेक्षा आहे.


१६ डिसेंबरला घेणार अध्यक्षपदाची सूत्रे


रामचंद्रन यांनी सांगितले की, निवडीची घोषणा सोमवारी झाली, तरी अध्यक्षपदी नेमणुकीचे अधिकृत प्रमाणपण राहुल गांधी यांना १६ डिसेंबर रोजी मावळत्या पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि अन्य ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत दिलं जाईल. त्या दिवशी सकाळी ११ वाजता १३२ वर्षांच्या जुन्या पक्षाची धुरा अध्यक्ष या नात्याने स्वीकारल्यानंतर राहुल गांधी काँग्रेस मुख्यालयात देशभरातून आलेल्या पक्षनेत्यांच्या भेटीगाठी घेतील.