नवी दिल्ली : काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या ज्योतिरादित्य सिंधियाबाबत राहुल गांधींनी मौन सोडलं आहे. ज्योतिरादित्य सिंधिया हे काँग्रेसमधले एकमेव नेते होते, जे माझ्या घरी कधीही, केव्हाही परवानगी न घेता येऊ शकत होते, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस सोडण्यापूर्वी ज्योतिरादित्य सिंधिया यांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधींना भेटण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना वेळ देण्यात आला नसल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं, त्यावर राहुल गांधींनी ही प्रतिक्रिया दिली आहे.


राहुल गांधी यांनी भाजपवरही निशाणा साधला आहे. पंतप्रधान मध्य प्रदेशात निवडून आलेलं सरकार अस्थिर करण्यात व्यग्र आहेत. जागतिक पातळीवर इंधनाच्या किंमतीमध्ये ३५ टक्क्यांनी कपात झाली आहे. याचा फायदा तुम्ही सामान्य भारतीयांना पोहोचवाल का? पेट्रोलचे भाव ६० रुपये लिटरच्या खाली येतील का? याचा फायदा अडचणीत असलेल्या अर्थव्यवस्थेला होईल, असं ट्विट राहुल गांधींनी केलं आहे.



ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यामुळे मध्य प्रदेशमधलं काँग्रेसचं सरकार अडचणीत आलं आहे. मध्य प्रदेशमधल्या २२ आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे कमलनाथ सरकार अस्थिर झालं आहे. ज्योतिरादित्य सिंधियांच्या या बंडामुळे मध्य प्रदेशामध्ये पुन्हा भाजपचं सरकार येण्याची शक्यता बळावली आहे.


दुसरीकडे भाजपमध्ये दाखल होताच ज्योतिरादित्य सिंधिया यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसकडून जनतेला दिलेली अनेक आश्वासनं पाळली गेली नाहीत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं वचन कागदोपत्रीच असल्याचं सांगत तरुण पिढीत रोजगाराच्यागी संधी नसल्याचं वास्तव त्यांनी सर्वांपुढे ठेवत रोजगाराला संधी नसली तरीही भ्रष्टाचाराला मात्र पक्षात वाव आहे असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर टीका केली होती.


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे, जनसेवेसाठीच आपण प्रयत्नशील असू, अशी भावना ज्योतिरादित्य सिंधिया यांनी व्यक्त केली.