राहुल आणि प्रियंका गांधींना हाथरसला जाण्याची परवानगी
प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्यासोबत फक्त ५ जणांना कुटुंबाची भेट घेण्याची परवानगी उत्तर प्रदेश सरकारने दिली.
लखनऊ : उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे एका मुलीवर सामुहिक बलात्कार आणि तिची हत्या करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण देशभरात वातावरण चांगलेच तापत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी पीडितच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी दिल्लीवरून हाथरसकडे रवाना झाले होते. त्यांना पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्यासोबत फक्त ५ जणांना कुटुंबाची भेट घेण्याची परवानगी उत्तर प्रदेश सरकारने दिली.
दरम्यान, याआधी राहुल आणि प्रियंका गांधी-वाड्रा यांनी गुरुवारी पीडित कुटुंबियांना भेटण्यासाठी हाथरसला जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना उत्तर प्रदेश सरकारने रोखले होतं. यावेळी राहुल गांधी यांना जोरदार धक्काबुक्कीही करण्यात आली होती.
दरम्यान आज पुन्हा त्यांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेण्याचा निर्णय घेतला. यापार्श्वभूमीवर नोएडात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे आज पुन्हा राहुल गांधींचा ताफा पोलिसांकडून रोखण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र त्यांना पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.