Rahul Gandhi Disqualification : राहुल गांधी यांच्यावर कारवाई; वायनाड येथे `काळा दिवस`, तर महाराष्ट्रात तीव्र आंदोलन
Rahul Gandhi Disqualification : राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्य रद्द केल्याच्या निषेधार्थ वायनाड येथे `काळा दिवस` पाळण्यात येणार आहे. तर राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यामुळे काँग्रेसने देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. सोमवारी महाराष्ट्र राज्यात काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे.
Rahul Gandhi Disqualification : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्य रद्द केल्याच्या निषेधार्थ वायनाड येथे 'काळा दिवस' पाळण्यात येणार आहे. वायनाड जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रमुख एनडी अप्पाचन यांनी सांगितले की, पक्ष शनिवारी 'काळा दिवस' पाळणार आहे. तर राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यामुळे काँग्रेसने देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. दरम्यान, सोमवारी महाराष्ट्र राज्यात काँग्रेसतर्फे आंदोलन केलं जाईल. ओबीसींच्या अपमानाची नौटंकी भाजपतर्फे केली जात आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
राहुल गांधी केरळमधील वायनाड मतदारसंघातून खासदार होते. तत्पूर्वी, केरळमधील विरोधी पक्षनेते व्हीडी सतीसन म्हणाले की, राहुल गांधींवरील कारवाई घाईघाईने आणि राजकीय हेतूने प्रेरित होती. सूरत न्यायालयाचा निर्णय अंतिम नाही, असे काँग्रेसकडून म्हटले आहे. काँग्रेसचा लोकशाही आणि कायद्याच्या राज्यावर विश्वास आहे. देशात सर्वोच्च न्यायालयापर्यंत विस्तारलेली कायदेशीर व्यवस्था आहे. राहुल गांधी कायदेशीर मार्गाने परत येतील. या कारवाईबाबत काँग्रेस शांत बसणार नाही. आम्ही यापुढेही लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष मूल्यांसाठी आवाज उठवू, असा इशारा काँग्रेसने दिला आहे. राहुल यांच्या कारवाईविरोधात विरोधक आक्रमक झालेय आहेत. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पायऱ्यांवर तोंडाला काळी पट्टी बांधून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात आदित्य ठाकरेही हाताला काळी पट्टी बांधून पायऱ्यांवर सरकारचा निषेध केला.
राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाची माफी मागावी अशी मागणी काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी केली आहे. ओबीसी व्होटबँकेला भाजपकडे जाण्यापासून रोखण्यासाठी राहुल गांधींनी माफी मागावी असं देशमुख म्हणतात. मोठा ओबीसी समाज नाराज असेल तर राहुलजींनी नक्कीच माफी मागावी, ही आमची मागणी असेल असं ते म्हणाले. तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या खासदारकी रद्दच्या निर्णयावरून राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. आज जे सत्तेचा गैरवापर करता येत नाही. त्यांना भविष्यात विरोधी पक्षात जावं लागेल. त्यावेळी त्यांची अवस्था काय होईल, इशा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते.
दरम्यान, लोकसभा खासदारकी रद्द झाल्यावर आज राहुल गांधी पत्रकार परिषद घेणार आहेत. दुपारी 1 वाजता राहुल गांधी यांची पत्रकार परिषद होणार आहे. दरम्यान काँग्रेसने जनआंदोलन करण्याची घोषणा केलीय. खासदारकी रद्द झाल्यावर राहुल गांधी यांची ही पहिली पत्रकार परिषद आहे. त्याचबरोबर आज काँग्रेस कार्यकर्ते देशभरात आंदोलन करणार आहेत. या प्रकरणी पुढील लढा देण्यासाठी काँग्रेसने 5 सदस्यीय समिती स्थापन केलीय. समितीच्या सदस्यांची नावं लवकरच जाहीर होतील.
राहुल गांधी यांनी एप्रिल 2019 मध्ये कर्नाटकातील कोलार येथे लोकसभा निवडणुकीच्या सभेत "सर्व चोरांना मोदी हेच आडनाव कसे आहे" अशी टिप्पणी केली होती. गुजरातमधील सूरत येथील भाजपचे आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल केला होता. या मानहानीप्रकरणी राहुल दोषी ठरले आणि त्यांना दोन वर्षांची शिक्षा झाली. मात्र, कोर्टाने त्यांना तात्काळ जामीन देत अपील करण्यासाठी 30 दिवसांची मुदतही दिली होती. अपील करण्याआधीच राहुल यांच्यावर थेट कारवाई करण्यात आली.