Rahul Gandhi First Reaction On Disqualification: `मी कोणतीही...`; खासदारकी गमावल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
Rahul Gandhi First Reaction Disqualification: राहुल गांधींनी या प्रकरणामध्ये अगदी मोजक्या शब्दांमध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. सुरत कोर्टाने 2 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्याची नोटीस जारी करण्यात आली आहे.
Rahul Gandhi First Reaction Disqualification: खासदारकी गमावल्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. राहुल गांधींनी सोशल मीडियावरुन आपली पहिली प्रतिक्रिया नोंदवताना आपण कोणतीही किंमत मोजण्यासाठी तयार आहोत असं म्हटलं आहे.
राहुल गांधींविरोधात कारवाई करण्यात आल्यानंतर काँग्रेसबरोबरच मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीनेही पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. राहुल गांधींचे निकटवर्तीय असलेल्या नेत्यांबरोबरच त्यांची बहीण प्रियंका गांधी यांनीही थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. त्याचप्रमाणे राहुल गांधी यांच्या आई आणि काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधीही राहुल यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहचल्या आहेत. दरम्यान राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु असतानाच राहुल गांधींनीही या कारवाईनंतर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. राहुल गांधींनी आपली भूमिका मांडण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे.
राहुल गांधींनी खासदारकी गमावल्यानंतर त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन अगदी मोजक्या शब्दांमध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. रागुल गांधींनी आपण भारतीयांचा आवाज बनून यापुढेही लढत राहू आणि त्यासाठी कोणतीही किंमत मोजण्यास आपण तयार आहोत असं म्हटलं आहे. "मी भारताच्या आवाजासाठी लढत राहील. मी कोणतीही किंमत मोजण्यासाठी तयार आहे," असं राहुल गांधी म्हणाले आहेत.
सुरत कोर्टातील 2019 च्या 'मोदी अडनाव' या मानहानीच्या प्रकरणामध्ये राहुल गांधींना दोषी ठरवण्यात आलं आहे. सुरत न्यायालयाने राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यानंतर लोकसभेच्या सचिवांनी राहुल यांची खासदारी रद्द करण्यात येत असल्याचा हा निर्णय एक नोटीस जारी करत जाहीर केला. 2013 च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार गुन्हेगारी प्रकरणांमध्ये 2 वर्षांपर्यंत शिक्षा सुनावण्यात आलेल्या खासदाराचं सदस्यत्व तातडीने रद्द केलं जातं. 'मोदी अडनाव' प्रकरणावरुन दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधींना दोषी ठरवण्यात आलं आहे. सध्या राहुल गांधी जामीनीवर बाहेर आहेत. या प्रकरणासंदर्भात वरिष्ठ न्यायालयामध्ये सुनावणी होत नाही तोपर्यंत सुरत न्यायालयाचा हा निकाल कायम राहणार आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या देशभरातील प्रमुख नेत्यांची ऑनलाइन माध्यमातून बैठक होणार असून पुढील वाटचाल कशी राहणार आहे यासंदर्भातील निर्णय या बैठकीमध्ये घेतला जाण्याची शक्यता आहे.