राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष पुन्हा होण्याची शक्यता?
काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा हाती घ्यावीत यासाठी हंगामी सोनिया गांधी यांनी नव्याने प्रयत्न सुरू केले आहेत.
नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा हाती घ्यावीत यासाठी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नव्याने प्रयत्न सुरू केले आहेत. राहुल गांधी देखील आता सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. ते नेत्यांच्या पुन्हा एकदा बैठका घेत आहेत. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शुक्रवारी बोलावलेल्या चहापान कार्यक्रमालाही त्यांनी हजेरी लावली. दिल्लीत आज रामलीला मैदानावर होणाऱ्या काँग्रेसच्या मेळाव्यातही ते भाषण करण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात विरोधी पक्षांचे सरकार स्थापन झाल्यामुळे निर्माण झालेला उत्साह, मरगळलेली अर्थव्यवस्था आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयीचा असंतोष या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा आज मेळावा आहे. या मेळाव्यात राहुल गांधी यांनी राजीनामा मागे घ्यावा, अशी विनंती काँग्रेसचे नेते करणार असल्याचं समजते आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह पक्षाच्या अनेक ज्येष्ठांनी राहुल गांधींनी राजीनामा मागे घेण्याचे आवाहन जाहीरपणे केले आहे.
सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून हरियाणा आणि महाराष्ट्रासह अनेक राज्यांत काँग्रेसचा आलेख वर नेला आहे. आता त्यांना प्रकृतीच्या कारणास्तव तसेच इतर कारणांनी त्या जबाबदारीतून मुक्त व्हायचे आहे. त्या पार्श्वभूमीवर आता राहुल गांधी यांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.