नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने नुकतेच लागू केलेले नवे कायदे म्हणजे देशातली दुसरी नोटबंदी असल्याची टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. या नव्या कायद्यांमुळे देशातल्या गरिबांचे मोठे नुकसान होणार असून हा नोटबंदीपेक्षा दुप्पट झटका असल्याचे राहुल गांधी यांनी टीका करताना म्हटले आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा आज १३५ वा स्थापना दिवस आहे. त्यानिमित्ताने दिल्लीत काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत हा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी राहुल यांनी मोदी सरकारवर पुन्हा हल्लाबोल केला आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुधारित नागरिकत्व कायदा (CAA), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) तसेच राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (NPR) च्या मुद्यावरून केंद्रसरकारवर टीकास्त्र सोडले आहे. एनआरसी आणि एनपीआर हे देशातील गरिबांवरील टॅक्स आहे आणि नोटाबंदी देखील देशातील गरिबांवरील टॅक्सच होता, असे त्यांनी म्हटले आहे. याचबरोबर भावांमध्ये भाडंण लावून देशाचे भले होऊ शकत नाही, असे देखील राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 



देशाची परिस्थिती सध्या वाईट अवस्थेत आहे. मंदी आहे. रोजगार उपलब्ध होत नाही. आहे ते रोजगार हातचे जात आहेत. ही परिस्थिती सगळ्यांनाच माहित आहे. शेतकरी आत्महत्या, अर्थव्यवस्थेची वाईट परिस्थिती, बेरोजगारी या सर्व समस्या आज समोर आहेत.  जोपर्यंत देशातील सर्व नागरिकांना एकमेकांशी जोडले जात नाही, या समस्या संपणार नाहीत. तसेच, अगोदर जग म्हणत होतं की, भारत आणि चीन एकाच गतीने पुढे जात आहे. मात्र, आता जग भारतात हिंसा पाहत आहे, महिला रस्त्यांवर स्वतःला सुरक्षित समजत नाहीत, बेरोजगारी वाढत आहे, अशी चिंता राहुल गांधी यावेळी व्यक्त केली.