आम्ही शिवभक्तच, कुणाला सर्टिफिकेट दाखवण्याची गरज नाही - राहुल गांधी
सोमनाथ मंदिरात जाताना हिंदू नसल्याच्या नोदींवरून उफाळून आलेल्या वादावर अखेर राहुल गांधी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
गुजरात : सोमनाथ मंदिरात जाताना हिंदू नसल्याच्या नोदींवरून उफाळून आलेल्या वादावर अखेर राहुल गांधी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या आजी इंदिरा गांधी या शिवभक्त होत्या. त्यामुळे आमचं कुटुंबही शिवभक्तच आहे. मात्र धर्म ही वैयक्तिक बाब असल्यामुळे कुणाला याचं सर्टिफिकेट दाखवण्याची गरज नाही.
‘धर्माची दलाली करत नाही’
आम्ही धर्माची दलाली करत नसल्याचाही टोला त्यांनी यावेळी नाव न घेता भाजपला लगावला. गुजरातमधल्या अमरेलीत गुरुवारी संध्याकाळी काही व्यापा-यांशी संवाद साधताना राहुल गांधींनी हे मत व्यक्त केल्याचा व्हिडिओ गुजरातमध्ये व्हायरस झालाय. आता राहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजप काय प्रतिक्रिया देणार याकडे लक्ष लागलंय.
शेतक-यांना राहुल यांचं आश्वासन
गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी गुजरातमध्ये तळ ठोकून बसले आहेत. लाठीमध्ये झालेल्या सभेमध्ये राहुल गांधींनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं आहे. गुजरातमध्ये काँग्रेसचं सरकार आलं तर शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, असं राहुल गांधी म्हणालेत.
'१० दिवसांमध्ये धोरण बनवू'
काँग्रेसचं सरकार आल्यावर १० दिवसांमध्ये शेतकरी कर्जमाफीचं धोरण तयार करू असं आश्वासन राहुल गांधींनी दिलं. २२ वर्ष मोदी शेतकऱ्यांविषयी बोलत आहेत, पण तुम्हाला काहीच मिळालं नाही. उलटं तुमची जमीन घेतली गेली. तुमचं पाणी उद्योजकांना देण्यात आलं. शेतकऱ्यांना पीक विमाही मिळत नाही, असा आरोप राहुल गांधींनी केला.
मोदी-जेटलींनाही टोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली त्यांच्या पाच-दहा मित्रांचं १.२५ लाख कोटींचं कर्ज माफ करतात. पण शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणं आमचं धोरण नसल्याचं जेटली म्हणतात, असा टोला राहुल गांधींनी लगावला. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी हे रबर स्टॅम्प आहेत. अमित शहा गुजरातचे रिमोट कंट्रोल असल्याची टीका राहुल गांधींनी केली.