नवी दिल्ली: यवतमाळमधील टी १ वाघिणीला वनखात्याने ठार केल्यानंतर रंगलेल्या वादात आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उडी घेतली आहे. राहुल यांनी ट्विटरवरून महात्मा गांधीजींचे एक वाक्य ट्विट केले. एखाद्या देशात पशुंना कशाप्रकारे वागणूक दिली जाते, यावरुन त्या राष्ट्राची महानता लक्षात येते, असे गांधीजींनी म्हटल्याची आठवण त्यांनी करुन दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तत्पूर्वी रविवारी केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनीही या घटनेविषयी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. टी १ वाघिणीला मारण्यासाठी नवाब शफाअत अली खान यांना पाचारण करण्याच्या वनखात्याच्या निर्णयावर त्यांनी बोट ठेवले होते.


वाघिणीची हत्या केल्याने मी खूप दु:खी आहे. चंद्रपुरात शहाफत अली खान यानं आतापर्यंत ३ वाघ, १० बिबट्या, अनेक हत्ती आणि जवळपास ३०० रानडुकरांची हत्या केली आहे. अशा माणसाला तुम्ही अमानवी कृत्य करण्यासाठी कसं काय नेमू शकता, असा सवाल त्यांना विचारला होता. या प्रकरणी मी राजकीय आणि कायदेशीर कारवाईचा विचार करत असल्याचा इशाराही मनेका गांधी यांनी दिला होता.